नागपूर: माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) उपलब्ध करून दिला आहे. एआय च्या वापरामुळे मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाच्या मर्यादा कमी झाल्या आहेत. AI च्या मदतीने ज्या भाषेत हवी ती माहिती सहज उपलब्ध होते, त्यामुळे तंत्रज्ञान समजून घेणे आणि त्याचा परिपूर्ण वापर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते. कार्यक्रमाला नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे आणि दयानंद कांबळे उपस्थित होते.
ब्रिजेश सिंह म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर भीती असली तरी योग्य वापरातून नवनवीन संधी निर्माण होतात. AI च्या माहितीस अधिक पडताळून आणि त्रुटी दुरुस्त करून ती नैतिक व संवैधानिक चौकटीत सादर करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात राहुल पांडे यांनी सांगितले की, AI चा योग्य वापर भारत विरोधी कृत्यांसाठी होऊ नये, यासाठी AI ची माहिती भारतीय पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलाही AI शी जोडणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप मैत्र, संचालन डॉ. गणेश मुळे, तर आभार दयानंद कांबळे यांनी मानले. राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला.