अहवाल विलंबामागे दडलंय काय ?

ॲस्टेक कंपनीत लागलेल्या आगीस जबाबदार कोण?

पोलिसांकडून तीन चार वेळा स्मरणपत्र देऊनही फॅक्टरी इन्स्पेक्टरकडून अहवाल देण्यास टाळाटाळ !

महाड, (संजय भुवड) – महाड औद्योगिक वसाहती मधील ॲस्टेक लाईफ सायन्सेस केमिकल लि. या कंपनीत 10 एप्रिल 2024 रोजी रात्री भीषण आग लागून 20 लाखाचे नुकसान झाले होते. सुदैवाने या भिषण आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र या आगी मागील कारण काय? यामागे कंपनीतील कोणत्या अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा कारणीभूत होता याबाबतचा अहवाल ज्यांच्याकडून वेळेत येणे अपेक्षित होते आणि तसा अहवाल देण्याची ज्यांची जबाबदारी व कर्तव्य आहे त्याच फॅक्टरी इन्स्पेक्टर यांचेकडून हा अहवाल देण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असल्याने या आगीस जबाबदार असणाऱ्या कंपनीतील अधिकाऱ्यांचे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांचे साटेलोटे तर नाही ना असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


महाड औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल झोन असल्याने बऱ्याचशा कंपन्यांमध्ये घातक केमिकलचा वापर करून उत्पादन घेतले जात असते. अशा कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात. मात्र मागील एक दोन वर्षात घातक रसायनांचा वापर व साठा करून ठेवलेल्या कंपन्यांमध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी ब्लु जेट कंपनीत लागलेली भीषण आग हे याचे ताजे उदाहरण आहे. या आगीत 11 कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या आगीची कारणमिमांसा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या दुर्घटनेला एक वर्ष होऊन गेला तरीही हा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. अशाच प्रकारची आग 11 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्री 1 वा. चे दरम्यान ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये लागली होती. कंपनीतील डि.डि.ए.प्लॅटमधील एस.सी. एल स्क्रबर टँकचे तापमान वाढून त्यामधून धूर येत होता व सदर टँकचे तापमान कमी करण्याचे काम फायर ब्रिगेडच्या सहाय्याने पाणी व फोम मारून कमी केले जात होते परंतु 01.45 वा. चे सुमारास अचानक एस.सी.एल. स्क्रबर साठविण्याची टाकी ही प्लास्टीकची असल्याने त्या टाकीने अचानक बाहेरून पेट घेतला त्यामुळे कंपनीचे डि.डि.ए. प्लँटचे स्क्रबर एरिया मधील टाक्या ब्लोअर, केमिकल सप्लाय करण्याचे पाईप लाईन तसेच इतर साहित्य हे जळून कंपनीचे सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले.


या घटनेनंतर या आगी मागील कारण मिमांसा कळावी यासाठी महाड एमआयडीसी पोलिसां कडून फॅक्टरी इन्स्पेक्टर यांना ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीचे घटना घडले ठिकाणची पाहणी करून सदरची घटना कशामुळे झाली असून कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे काय तसेच सदरची घटना कशामुळे झाली याबाबत आपला स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र या घटनेला 7 महिने होऊन गेले तरीही हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही. यासाठी पोलिस प्रशासना कडून संबंधित फॅक्टरी इन्स्पेक्टर यांना तीन ते चार स्मरण पत्र पाठवण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी दिली.


ॲस्टेक कंपनीच्या आजुबाजुस अन्य कंपन्या व मानवी वस्ती असून या आगीचा भडका उडून त्याची झळ शेजारील कंपन्या व गावांना बसली असती तर महाडचा भोपाळ होण्यास वेळ लागली नसती. महाड औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले असून या आगीचे प्रमाण रोखण्याचे काम कंपनीची नियमित तपासणी करण्याचे काम करणाऱ्या फॅक्टरी इन्स्पेक्टर यांची असून तेच फॅक्टरी इन्स्पेक्टर जर अशा प्रकारांना खत पाणी घालून या आगींना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असतील तर ते महाड औद्योगिक वसाहती मधील कंपन्या, त्यात काम करणारे लाखो कामगार आणि आजुबाजुला राहणारे नागरिक यांच्यासाठी धोकादायक असून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि त्यांच्याशी साटेलोटे करणारे कंपनीचे अधिकार यांच्यावर कडक कारवाई करण्याची व महाडचे प्रांताधिकारी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Share