इतिहासाचे सत्य आणि विकृतीकरणाचा संघर्ष

एक बोधकथा आहे. अनेकांनी ती शालेय पुस्तकात वाचली देखील असेल. चार आंधळे एका हत्तीजवळ जातात आणि स्पर्शाने तो हत्ती अनुभवतात. ज्याच्या हाताला शेपटी लागते तो सांगतो हत्ती सापासारखा आहे. जो हत्तीच्या पायाला स्पर्श करतो तो सांगतो हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हाताला कान लागतो तो सांगतो हत्ती सुपासारखा आहे तर ज्याच्या हाताला सोंड लागते तो सांगतो हत्ती हातासारखा आहे. ते आंधळे होते. त्यांना हत्तीची जी अनुभूती मिळाली ती त्यांनी वर्णन तरी केली.

पण आज आपण डोळे असून आंधळे , डोके असून अज्ञानी झालो आहोत. त्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.डोळे असून आंधळे आणि डोके असून बिनडोक असण्यामुळे वास्तव आणि विकृती यातील फरक आपल्याला कळेनासा झाला आहे. आपल्यातील याच दोषामुळे विकृत इतिहास लिहिला गेला आणि तोच खरा इतिहास म्हणून आपण डेक्यावर घेवून नाचलो. जेव्हा आधुनिक इतिहासकारांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेवून सत्य इतिहास जगासमोर मांडला तेव्हा त्यांच्या सत्यकथनावर आपण सहजासहजी विश्वास ठेवला नाही. दुर्दैवाने काही लोक आणखी एक विशिष्ट चष्मा डोळ्यासमोर ठेवून ईतिहासाचे विकृतीकरण करण्यात स्वतःला धन्य समजतात आणि आपण सांगतो तोच इतिहास खरा असा विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न करत त्यावेळेस त्यांना दुर्लक्षित करण्याऐवजी विशिष्ट समाज घटक त्याची री ओढायला सुरुवात करतात त्यावेळेस समाजाने सारासार विचार करण्याची शक्ती गमावली आहे, याचे प्रत्यंतर आल्या खेरीज राहात नाही.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. विद्येविना मती गेली।

मतिविना निती गेली। नितिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले । असे सांगत त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पुण्यातल्या भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यांच्या या स्त्री शिक्षणाच्या यज्ञात त्यांना तोलामोलाची साथ दिली त्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी. त्या पहिल्या शिक्षिका ठरल्या. सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख. फातिमा शेख यांचे नाव आणि आडनाव जर वेगळ्या धर्माचे असते तर आज सावित्रीबाई फुले यांच्या इतकाच त्यांनाही मानसन्मान मिळाला असता. पण केवळ त्यांचे नाव फातिमा शेख आहे म्हणून त्यांचे अस्तित्वच नाकारण्याचा करंटेपणा एका तथाकथित संशोधकाने दाखविला आहे आणि त्याचे समर्थन करण्यासाठी अनेक बेगडी विचारवंत मैदानात उतरले आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले किंवा त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांचा इतिहास काही हजार पाचशे वर्षांपूर्वीचा नाही की त्या काळातील उपलब्ध दस्तावेजांचा अर्थ लावता येणार नाही. इनमीन दीड दोनशे वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे आणि त्याचे दस्तावेज तत्कालीन प्रचलीत मराठीत आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे. जेम्स लेन नामक पाश्चात्य इतिहासकाराने उपलब्ध दस्तावेजातील संदर्भांचा अर्थाचा अनर्थ लावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे विकृतीकरण केले. प्रचंड क्षोभ उसळला. त्याची पुस्तके जाळली गेली. त्याला ऐतिहासिक दस्तावेत उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राची तोडफोड करण्यात आली. त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री होते स्व. आर. आर. पाटील त्यांनी एका वाक्यात सांगितले होते, शिव चरित्राचे विकृती करणारांना एकच उत्तर दिले जायला हवे ते म्हणजे कानाखाली आवाज.कोण्या दिलीप मंडल नामक अशाच इतिहासाची विकृती करण्यात धन्यता मानणाऱ्याने फातिमा शेख नावाची व्यक्तीच नव्हती असा जो दावा केला आहे तो दावा खरा तर दुर्लक्ष करण्याच्या लायकीचाच आहे. पण इतिहास पुरुषांचे नाव घेवून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे धंदे करणारे समाज माध्यमांवरील जे त्याचे समर्थन करित जे थैमान घालू लागले आहेत ते चिंताजनक म्हणावे लागेल. विकृत तर्क लावून इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. दिलीप मंडल हे त्याचे उदाहरण. अशा परिस्थितीत समाजाने एकत्रितपणे जागरूक राहून ऐतिहासिक सत्याचा प्रचार आणि विकृतीकरणाला प्रतिकार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

Share