एक अजातशत्रू व्यक्तिमत्व : डॉक्टर अनिल धारप

माझे सन्माननीय मित्र व महाडचे जेष्ठ फॅमिली डॉक्टर डॉ. अनिल धारप यांचा गेली 40 वर्षे महाडमध्ये वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल नुकताच नवी मुंबई येथील एका संस्थेमार्फत धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ही केवळ माझ्या दृष्टीनेच नव्हे तर या भागातील सर्वच डॉक्टरांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काही वर्तमानपत्रात लेखही प्रसिद्ध झाले. पण त्यांनी गेली अनेक वर्षे वैद्यकीय संघटनेकरता केलेल्या कर्तृत्व अलिखित राहिले. या कर्तृत्वाचा मी एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साक्षीदार आहे.

साधारण 1990 च्या दरम्यान मी महाडमध्ये आलो आणि तेव्हापासून मला अनेक वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेत काम करण्याची व नेतृत्व करण्याची सुदैवाने संधी मिळाली. यशही मिळाले. पण माझ्या या यशात या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मित्रांचे सहकार्य व योगदान असल्यामुळेच मला यश मिळाले यात वाद नाही. वैद्यकीय क्षेत्र व वैद्यकीय संघटनाही याला अपवाद नाहीत. महाड पोलादपूर भागातील अनेक तरुण डॉक्टर मित्रांचे माझ्या यशातले योगदान नजरेआड करता येणार नाही. या अनेक मित्रांपैकीच माझे एक मित्र डॉ. अनिल धारप.

महाडला आल्यानंतर काही दिवसातच येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी मला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाड शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. डॉ. धारप त्या दरम्यान आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायात स्थिर झाले होते. कुठलीही जबाबदारी घेतली की शेंडी तुटो वा पारंबी, ते ती जबाबदारी पार पाडणारच हे त्यांच्यातले एक अजब कौशल्य माझ्या लक्षात आले होते. या संघटनेचा सचिव पदाची जबाबदारी घेण्याची मी त्यांना विनंती केली. मी आणि डॉ. धारप यांनी सर्वांच्या मदतीने ग्रामीण भागातील डॉक्टरांना उपयोगी होतील अशा अनेक विषयावर सातत्याने अनेक परिसंवादाचे आयोजन केले. धारपजी बरोबर असल्यावर ते कार्यक्रम यशस्वी होणारच याची मला पूर्ण खात्री होती. आणि ते यशस्वी झालेही. या दरम्यान आम्ही ग्रामीण भागातील डॉक्टरांकरीता बालरोगशास्त्रातील महत्वाच्या विषयावर संपूर्ण दिवसाचे अधिवेशन करावयाचे ठरविले. महिन्यातून एकदाच दोन-तीन तासाकरतादेखील डॉक्टर येत नाहीत तर ते दिवसभर येणे अशक्यच अशी शंका उपस्थित केली गेली. पण डॉ. धारपांच्या मदतीने आम्ही या परीसंवादाचे नियोजन केले आणि या परिसंवादाला दक्षिण रायगड मधील अनेक डॉक्टरांनी विक्रमी उपस्थिती नोंदवली. आमचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. याचे श्रेय डॉ. धारपांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमालाच.

एक दिवसाच्या या परिसंवादाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता आपण वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयावर दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे अशी एक कल्पना डॉक्टर धारपांच्या व माझ्या मनात तरळली. काही ज्येष्ठ व काही तरुण डॉक्टरांनी ही कल्पना उचलून धरली. दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये उपयोगी असणारे अनेक विषय आम्ही निवडले. त्याकरता महाराष्ट्रातील काही निवडक, अनुभवी, विषयाला न्याय देणारे वक्ते निमंत्रित केले. सर्व योजना अंतिम स्वरूपात आल्यानंतर या अधिवेशनात अनेक विघ्न आले. पण काही सिनियर डॉक्टरांच्या मदतीने अनेक संकटावर मात करत हे दोन दिवसांचे अधिवेशन न भूतो न भविष्यती यशस्वी झाले. याचे श्रेय डॉ. धारप ठामपणे माझ्यामागे उभे राहिल्यामुळे. या सर्व उपक्रमामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, महाड शाखेचा राज्य शाखेत एक वेगळा दबदबा निर्माण झाला. आज ते याचं संघटनेचे महाड शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर 2005-06 या वर्षी रायगड मेडिकल असोशिएशन या जिल्ह्याच्या डॉक्टरांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदावर माझी बहुमताने निवड झाली. पण डॉ. धारप यांना सचिवपदासाठी देणार असाल तरच मी ही जबाबदारी घेईन ही माझी पूर्व अट होती आणि आम्ही दोघांनी हा पदभार घेतला. त्यादरम्यान डॉ. धारप यांच्या मदतीने प्रथमत:च आम्ही जिल्ह्यातील केवळ डॉक्टरांकरिताच नव्हे तर सामान्य जनतेकरीता, महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता, शासकीय कर्मचाऱ्यांकरिता वर्षभर अनेक उपक्रम पहिल्यांदीच राबवले आणि या जिल्हा संघटनेला एक वेगळी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. डॉ. धारपांची सर्जनशीलता व शिस्तबद्धरीत्या काम करण्याच्या पद्धतीचा मला खूपच उपयोग झाला. जिल्हास्तरीय अधिवेशनाकरीता देखील धारप यांचे बरोबरच महाड व पोलादपूरच्या अनेक तरुण डॉक्टरांनी प्रचंड मेहनत करून हे अधिवेशन न भूतो न भविष्यती यशस्वी केले. महाड पोलादपूरचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला.

या अधिवेशनाचा आणखी एक फायदा असा झाला की महाड पोलादपुर तालुक्यातून जिल्हास्तरावर कार्य करणारी आणि नेतृत्व करणारी तरुण डॉक्टरांची एक संपूर्ण फळी तयार झाली.

डॉ. धारपांची सतत एकच इच्छा असावयाची व आजही आहे, ती म्हणजे परिसरातील डॉक्टर काहीही कारणाकरता एकत्र आले तर एखादा वैद्यकीय क्षेत्रातील विषय निवडून त्यावर चर्चा व्हावी. यातून त्यांच्याच कल्पनेतून निर्माण झाला एक प्रकल्प मेडिकल स्टडी ग्रुप. दहा-बारा डॉक्टरांनी एकत्र येऊन कुठलीही अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव ही बिरूदावली न मिरवता ही संघटना स्थापन झाली. दक्षिण रायगड मधील शे दीडशे डॉक्टर्स या वैद्यकीय परिसंवादाला दर महिन्यास हजेरी लावावयचे. कालांतराने डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाड ही संस्था स्थापन झाली आणि हे काम अव्याहतपणे या संस्थेने चालू ठेवले. पण या सर्व उपक्रमात डॉ. धारपांचा सिंहाचा वाटा कधीच विसरता येणार नाही. रोटरी क्लब ऑफ महाड या संस्थेमार्फत डॉ. धारपांनी आपली समाजसेवा महाडकरांना रुजू केली. महाडमध्ये दररोज सकाळी फिरणारी घंटागाडी आणि मुख्य रस्त्यावर केलेले डावे उजवे पार्किंग हे त्यांच्याच कल्पकतेचे फळ. तत्कालीन नगराध्यक्ष यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांच्या या यशात आणि पुरस्कारातही त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पद्मिनी धारप यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून कसे चालेल? कुटुंबवत्सल डॉक्टरांची दोन्ही मुले व दोन्ही सुना उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी कार्य करीत आहेत हे त्यांच्या सकृत्याचे फळ.

अशा या अजातशत्रू, सृजनशील, कुटुंबवत्सल मित्राबरोबर अनेक वर्षे संघटनेत काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे सदभाग्य समजतो. त्यांचे संघटनाकौशल्य, अजातशत्रू स्वभाव, कुठलीही जबाबदारी घेऊन कितीही संकटे आली, अडचणी आल्या तरी ती जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती या सर्व स्वभाववैशिष्ट्यांना माझा सलाम. तो दयाळू परमेश्वर त्यांना दीर्घ आयुरारोग्य देवो व त्यांच्याकडून असेच लोकोत्तर, अलौकिक कार्य सातत्याने घडो या शुभेच्छा.

  • डॉ. चंद्रशेखर दाभाडकर महाड
Share