माझे मराठी-हिंदी साहित्य लिखाण कॉलेजात असतांनाच सुरु झाले. ‘अंधार’ नामक तीन पानी(फुल स्केप) मराठी कथा लिहिली आणि कॉलेजात एका जिवलग मित्रास वाचायला म्हणून दिली. दुर्दैवाने ती मित्राकडून हरवली गेली. मी निराश झालो. झेरॉक्स हा प्रकार त्यावेळी आलेला नव्हता. लिखाण करताना खाली कारबन ठेवायचा आळस केला. आणि एक छानशी रोमँटिक मराठी कथा माझ्या आयुष्यातून नाहीशी झाली. तसे त्याचे मूळ कथानक आजही मला आठवते पण तशीच कथा पुन्हा लिहिता येणे शक्य नाही, म्हणून मी दुर्लक्ष केले.
पुढे एक बातमी वाचनात आली की ‘पैश्या अभावी मेडिकल कॉलेजमध्ये दाखला न मिळाल्याने एका होतकरु, हुशार मुलाने आत्महत्या केली…’ तो विषय असलेली एक कथा लिहिली. गिरगावतून प्रकाशित होणाऱ्या एका मराठी मासिकात छापून आली. तो आनंदी क्षण मला आजही आठवतो… अनेकांना दाखवली, कुणी काहीच बोलेना म्हणून माझे गुरु कमतनूरकर सरांना भीत- भीत दाखवली. त्या प्रकाशित कथेला दूर ठेवून त्यांनी मला सस्पेंस कथा लिहिण्यास सांगितले. मी गोंधळून गेलो. जेम्स हॅडली चेस याची इंग्लिश जाडजूड पुस्तके वाचतांना मी त्यांना पहायचो. पूढे त्यांनीच मला गूढ कथेविषयीचे दहा पॉईंट्स लिहून दिले. आणि कथेचे तीन वर्ग कसे होतात, तेही समजाऊन सांगितले. प्रथम मिनी कहाणी, दुसरी लघुकथा आणि तिसरी दीर्घकथा. आतां हे वर्गीकरण माझ्या मेंदूत जायला त्यावेळी थोडा वेळ लागला. पण सरांची बैठक सामाजिक किंवा रोमँटिक आशयच्या कथा लिहिण्याची नव्हतीच! आधुनिक, फास्ट तसेंच वाचकांस आवडेल असे विषय सर निवडायचे. उर्दू शमा नामक मासिकांतून अशा विविध प्रकारच्या कथा छापून येत असत. हुमा, बिस्वीं सदी असे अंक मी वाचत असे. मराठीतील दिवाळी अंक मला खूप आवडायचे. ते वेड आजही कायम आहे.मात्र त्यावेळी लघुकथा आणि इतर त्याचे असे हे वर्गीकरण होते, ते माहित नव्हते. सरांच्या मुळे मला ते शिकता आले.
उर्दू , हिंदी आणि मराठी या तीनही भाषेतील प्रकाशित साहित्य मला वाचायला तेव्हापासून आवडत असे. अभ्यासाचा प्रमुख विषय सोशियोलॉजी असल्याने तसे माझे वाचन व्यापक होत असावे. खुशवंत सिंग, राजेंद्रसिंह बेदी, जोय अन्सारी, लक्ष्मीकांत वर्मा, मुंशी प्रेमचंद तसेंच आचार्य अत्रे, शन्ना नवरे, पुल, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर असे अनेक नामवंत लेखक माझ्या वाचनाचे मार्गदर्शक ठरलेत. जुने जाणकार साहित्यिक जरी श्रेष्ठ असले तरी मी नवीन लेखकांना आजही आवर्जून वाचतो. किंबहुना आजच्या पिढीला खरंच काय आवडत असावे वाचनात? नवोदितांचे साहित्य वाचतांना तेच मला मार्गदर्शक ठरते. विविध शाळा कॉलेजात कथाकथनाच्या कार्यक्रमातून माझा वावर होत असतो. सर्वत्र नसेल पण काही ठिकाणी परिक्षक म्हणून सन्मानाने निमंत्रित करतात.
आता काळ सोशल मिडियाचा आहे. आजच्या मुलांचे जगणे फास्ट आहे. कमी वेळेत जास्त स्पष्ट सांगता कसे येईल? याचे तंत्र आधुनिक मुलांकडून शिकता येते. किमान मी तरी तसे मान्य करतो. अलिकडेच एक स्वलिखित मराठी लघुकथा “मजनू” ऑडिओ फॉरमॅटमध्ये माझ्या Youtube channel वर अपलोड केली आहे. अनेकांनी त्यावर आपापली कमेंट्स दिली आहेत. काही रसिक अजून दिवाळी सुट्टीत व्यस्त आहेत. एका वाचकाने कथा अपूर्ण वाटत असल्याचे लिहिले आहे. तरुण पिढीकडे वाचनासाठी म्हणून तसा वेळ कमी असतो. प्रवासात ऑडीओ ऐकताना त्यांचे वाचन ही होते आणि मनोरंजन ही होतेच!
लघुकथा लिहितांना लेखकास कमीतकमी शब्दांत विषयावर फोकस करावे लागते. काही घटना वाचकांनी गृहीत धरायच्या असतात. ते तंत्र खूप जुने आहे. जे वाचन करतात त्यांना लघुकथा हा प्रकार कळत असावा.
एक हिंदी सिनेमा पाहिला ज्याचे नाव ‘एक पहेली’ असे होते. फिरोज खान आणि तनुजा हे कलाकार त्यात आहेत. हा एक भयपट होता. सिनेमाचा पाहिलाच सीन मनाचे ठोके वाढविणारा आहे. १९७१ चा हा सिनेमा अशा सिनेमाचे चाहते आजही आहेत. पहिलाच सीन असा आहे की, त्या वेळचे एक ज्येष्ठ कलाकार बी. एम. व्यास एका म्युझिक शोरूमचे मालक. प्रवेश दारातच दाढी बनवत आहेत. इतक्यांत तेथे तनुजा एक ख्रिस्ती मुलगी पियानो संगीत वाद्याची विचारणा करते. व्यास त्या मुलीला दुकानांत जाऊन पियानो प्रत्यक्ष प्ले करण्यास सांगतात. ती तरुण मुलगी एक छान अशी धुन त्या पियनोवर प्ले करते. दारावर बसलेले व्यास चकित होऊन त्या मुलीकडे पाहतात. दाढी बनवून होताच चेहर्यावरून टॉवेल फिरवतात इतक्यांत धुन वाजण्याची बंद होते आणि तेथील मुलगी ही अचानक नाहीशी होते! हिंदी असला तरीही हा सिनेमा शेवट पर्यंत सस्पेंस धरुन राहतो. त्यावेळी हा सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन पाहिल्याचे आठवते. गूढ किंवा भय कथा लिहिते वेळी या सिनेमाचा कळत नकळत माझ्यावर परिणाम झाला असावा हे शक्य आहे. पण कथा लिहिताना वाचक अशा वेळी ज्यास्त भारावून गेलेला असतो. हे स्वानुभवातून सांगू शकतो.
पुढे हिंदी सिनेमामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला. लघुकथेवर आधारित सन १९७४ पासून सिनेमा समांतर कथानकाच्या दिशेने रसिकांसमोर येऊ लागला. श्याम बेनेगल त्याचे जनक! यांनी अंकुर नामक सिनेमा रिलीज केला ज्यामध्ये शबाना आझमी सारखी कसलेली नायिका आपल्यातले हुनर दाखवून गेली. त्या सिनेमाची ओळख समांतर किंवा पॅरेलल अशी होऊ लागली. फ़क्त दीड तासांत संपूर्ण कथानक पडद्यावर चित्रित केलेले दिसले. मोजकीच दोन-तीन अर्थपूर्ण गाणी, खऱ्या, सजीव लोकेशन्स आणि बहुतांश कलाकार हे पुणे फ़िल्म, टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट मधून शिक्षित झालेले! कसलाही भपका नाही. अशा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाजू उदाहरणार्थ डबिंग, एडिटिंग, पार्श्वसंगीत इत्यादी कमालीच्या शुद्ध. अती जाहिरातबाजी न करता, शहराच्या निवडक जागीच फिल्मचे होर्डिंग्ज लावलेले. लो बजेटमध्ये तयार झालेला हिंदी सिनेमा लोकांना, विशेषतः तरुणांना आवडू लागला. वितरकाना आर्थिकदृष्ट्या बजेट पेक्षा डबल कमाई होऊ लागली. नायक नाईकांच्या व्यतिरिक्त इतर कलाकारांना सुद्धा काम मिळू लागले. सिनेमाची एकूण मांडणी कथानका पर्यँत सीमित असायची. कमर्शियल सिनेमात मुख्य कलाकारांना नाचगाणी करावी लागत असत, दे दणादण फाईट करावे लागत असत. त्रिकोणी प्रेमकथा आणि विनोदी उत्कट चाळयात गुरफटलेले उपकथानक! आठ गाणी, विदेशी चित्रीकरण… इत्यादी पेक्षा समांतर सिनेमा म्हणून त्यावेळी हिणवला जाणारा हिंदी सिनेमा, कथेशी प्रामाणिक राहिला म्हणून खिडकीवर चालला. नसिरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा, ओम पुरी, स्मिता पाटील, असराणी, पेंटल, फारुख शेख, दीप्ती नवल अशी कलाकारांची फळी तयार होऊ लागली. मुळात लघूकथेवर आधारित सिनेमाची स्क्रिप्ट फार बोलकी आसायची. म्हणूनच लघुकथा हा साहित्य प्रकार ज्यास्त जवळचा वाटू लागला.
आज काळ वेळ वेगाने बदलत आहे. Youtube वर अपलोड केलेल्या मजनू या गूढ कघुकथे विषयीं काहींचे मत वेगळे असू शकते. मात्र आजच्या पिढीला ही किंवा अशा प्रकारे कमीत कमी शब्दांत लिहिलेली कथा आवडते, किंवा ती ज्यास्त जवळची वाटते. त्यातल्या त्यात भय किंवा गूढ कथा असल्यास काही ठिकाणी वाचकांनी आपली आकलनशक्ती वापरून अमुक ही कथा अशिच का? त्याचे उत्तर मनोमनी मिळू शकेल हे निश्चित. वाचन हे प्रत्यक्ष पुस्तकांतून व्हावे, आज प्रिंट मीडियातील मासिक, साप्ताहिक असे प्रकार विस्मृतीत जाऊ लागले आहेत. पेपर हा एकमेव प्रिंट मिडिया असा आहे जो आजही तग धरून आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामिण भागातील लोकांना पेपर वाचनाची गोडी कळते. शहरी भागात आठ तास नोकरी करण्यासाठी म्हणून सहा तास प्रवास करावा लागतो. म्हणूनच ऑडियो यूट्यूब हे पर्यायी माध्यम छान आहे. शिवाय ज्याची दृष्टी अंधुक होत असेल आणि करणेंद्रिये जर व्यवस्थित असतील तर त्यांस ऑडिओ हा उत्तम पर्याय होऊ शकतो.
कोल्हापूरचे हरहुन्नरी मराठी तरुण साहित्यिक विष्णू वजारडे यांनी ‘किल्मिश’ ही मी लिहिलेली कथा ऑडिओ युट्युबवर सादर केली. अनेकांना त्याचे एंड चकित करणारे वाटले! तद्नंतर पुढील सर्व कथा गायक-संगीतकार गौतम वैद्य यांनी आपल्या कर्जत येथील प्रोग्रेसिव्ह स्टुडिओ मध्येच रेकॉर्ड केल्या आहेत. बगाराम नाना, तारेचा खांब, किस्ना, जोकर इत्यादी निवडक मराठी लघुकथा आज माझ्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत. श्रोत्यांनी त्याचा विनामूल्य आस्वाद घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष आनंद मिळू शकेल, कारण लहान अक्षरे वाचतांना त्रास होत असल्यास, ऑडिओ मधून कथा सहज ऐकता येईल.
नजर से नजर मिलाके तुम
नजर लगा गए,
ये कैसी लगी नजर के हम
हर नजरमे आगए
इकबाल शर्फ मुकादम