दिवाळी अंकाचे आकर्षण तर पहिल्यापासून होते. पण खरं तर वाचनाची आवड ही आई कडून आली..माझ्या आईला प्रचंड वाचनाचे वेड….इतके की सगळे काम आवरून रात्री ती पुस्तके..कथा, कादंबऱ्या आणि दिवाळी अंक वाचत असे..त्यावेळी आमच्याकडे तरुण भारतचा उत्कृष्ट असा दिवाळी अंक बाबा घेऊन येत असत…तेव्हा गाजलेला अजून एक दिवाळी अंक असायचा तो म्हणजे आवाज ..अजून एक चार पाच दिवाळी अंक असायचे ….दिवाळीचा फराळ खात खात अंक वाचण्याची मजा काही औरच….आणि इथूनच दिवाळी अंक वाचण्याची सवय लागली….. पुस्तके , कादंबऱ्या वाचण्याची सवय झाली…..वाचता वाचता निबंध लिखाणाची आवड निर्माण झाली नुसती आवड नाही तर स्पर्धेतील निबंध विजेते होऊ लागले, शाळेतील मॅगझिन मध्ये लेख प्रसिद्ध होऊ लागले….स्पर्धेसाठी नाट्यछटा लिहून द्याव्यात म्हणून मैत्रिणी हक्काने आग्रह करू लागल्या..त्यामुळे काही नाट्यछटा लिहून झाल्या …शब्दांभोवती मन फेर धरून नाचू लागले…….आणि यातून 11 वीत असताना माझी स्वप्नंसुंदरी आणि जीवन आहे सुंदर मस्त या दोन कविता लिहिल्या आणि त्या गाजल्या ही….याच दरम्यान माधवी ताई देसाई, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, वसंत बापट, कवी ग्रेस, शाहीर बाबासाहेब देशमुख, सु. रा. देशपांडे अशा प्रतिथयश व्यक्तिंना भेटण्याचा योग आला…आणि आर. के. पाटील, जोशी मॅडम, चंद्रकांत कदम यांच्या सारखे उत्कृष्ट शिक्षक भेटले….आणि जीवनाने एक छान वळण घेतले…..याच वेळेला नेमके माझे वडील हे जग सोडून गेले…..माझे बाबा माझे सर्वस्व होते….त्यांच्या जाण्याने हतबल झालेल्या माझ्या मनाला शब्दांनी आधार दिला….आणि इथून सुरू झाला माझा दिवाळी अंकाचा प्रवास.
1989 साली पुणे येथील आनंद राधा या दिवाळी अंकात माझी कविता छापली आणि मला जो आनंद झाला तो आकाशाला गवसणी घालणारा होता….त्यानंतर लग्न झाले, संसार, मुले, नोकरी सांभाळताना फावल्या वेळेत अनेक कथा,कविता लिहिल्या गेल्या…. 2006 साली को.म.सा.प. कथा स्पर्धेत अनाथ या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले..हीच कथा मी ताम्रपर्णि या दिवाळी अंकात छापून आली आणि या कथेसाठी तेव्हा एक हजार मानधन मिळाले..आणि तेव्हापासून गेली 18 वर्षे या दिवाळी अंकासाठी मी सातत्याने कथालेखन करत आहे..फक्त 2020 साली कोरोना मुळे अंक नव्हता.
2006 मध्ये प्रभा दिवाळी अंकात पाठवलेल्या कथेला तिसरे पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे माझ्या कथा सन्मानित झाल्या. यानंतर 2007 साली प्रेम दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाली. 2008 साली कुलाबा वैभव, सत्यघटना, मोहिनीराज या अंकात लेख, कथा,कविता समाविष्ट करण्यात आल्या तर तर 2010 मध्ये विकास अंक, दिव्यधन, अहमदनगर वार्ता या अंकात लेख छापून आले,2011 साली वर्षाव दिवाळी अंकाने माझी कथा प्रसिद्ध केली तर 2012 साली मी को.म. सा.प. शाखेची मी सभासद झाले आणि मुक्त छंद साठी लेखन करण्याची संधी मिळाली ,2013 हितवर्धक, 2014 स्वामीसखा या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले आता पर्यंत जवळ 14 दिवाळी अंक सातत्याने साहित्य प्रसिद्ध करत होते…2015 ला तर साहित्य संपदा, तेजोमय रायगड, आपले लक्षवेध, मराठा, वृत्त जागर आणि उल्हास प्रभात या सहा दिवाळी अंकात कथा,लेख प्रसिद्ध झाल्या तर 2016 ला या सर्व अंकाच्या जोडीला ऊर्जा दिवाळी अंक ही होता…तर 2017 ला महाड नगरी, लोकसारथी, अनिता या दिवाळी अंकांची माझ्या यादीत समावेश झाला.
तर 2018 ला कृषिराज, प्रतिभा संपन्न, साहित्यसेना, काव्यप्रेमी,शब्दकुसुम,काव्यप्रेमी,शब्द व्यासपीठ या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले तर 2019 मध्ये अधून मधून झपूर्झामध्ये कविता प्रसारीत होत होत्या, 2020 मध्ये अगदी लोकसह्याद्री,संचार, लोकराजा,भालचंद्र या दिवाळी अंकांचा माझ्या दिवाळी अंकांच्या यादीत समावेश झाला. खर तर 2021 ला दैनिक जनमत, दुर्गांच्या देशातून, विदर्भ वतन या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले, 2020 आणि 2021 ला कोरोना काळात काही अंक डिजिटल निघाले तर काही अंक प्रकाशित झाले होते,2022 ला तर व्यक्तिमत्त्व विकास, पुढारी दै.मुक्तागिरी, बेळगाव वार्ता, रायगड मित्र, कोंकण नाऊ, धनश्री असे अजून नवे सहा अंक यादीत समाविष्ट झाले,2023 विश्वभ्रमंती, शब्दशिवार,अक्षय सार्वमत, दैनिक रायगडचा आवाज,ऐतिहासिक रायगड,पंढरी भूषण या दिवाळी अंकात कथा आणि लेख प्रसिद्ध झाले आणि या वर्षी तर अक्षराज, शिखर आणि अनघा दिवाळी अंक ज्यामध्ये महाड आज, काल आणि उद्याहा विषय त्यांनी मला स्पेशल लिहायला दिला होता,शिखर आणि भावनागिरी या अंकानी इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख मागितले होते, तर ज्वाला दिवाळी अंक 50 वर्षे पूर्ण करत असताना नामवंत साहित्यिकांचे साहित्य छापताना त्यांचे मला पत्र आले की कथा पाठवा आणि आमच्या अंकात तुमची कथा पाहिजेच अशा आशयाचा फोन आला….अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ 55 दिवाळी अंकसाठी लेखन केले आणि मुख्य म्हणजे कथा आणि लेख जास्त प्रमाणात पाठवले आणि….पश्चिम महाराष्ट्रात एक माझा वाचक वर्ग तयार झाला..आणि यातूनच माझे कथासंग्रह असावेत ही संकल्पना पुढे आली आणि तिने आकार घेतला ….आणि माझी 17 पुस्तके प्रसिद्ध झाली दोन प्रकाशनाच्या वाटेवर आहेत……हे शब्द कायम माझ्या सोबत आहेत कारण आजही यातील 30 दिवाळी अंकात माझ्या कथा छापून येतात. दहा दिवाळी अंकात कविता,लेख छापून येतात….काही अंक कोरोना काळात काही दिवाळी अंक बंद झाले…..तर यातील काही अंक एका लेखकाला एकदाच संधी देतात……तर यातील काही अंकांचे येते…..दिवाळी झाली की दोन दिवसांनी अंक घरी यायला सुरवात होते ते अगदी देव दिवाळी पर्यंत 35 ते 40 अंक घरी येतात…मग त्यातील काही अंक साध्या पोस्टाने, काही अंक स्पीड पोस्टाने, काही अंक रजिस्टर पार्सल येतात…तर काही दिवाळी अंक कुरिअर ने येतात….एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टमनला माहीत असते अंक आमचे आहेत मग ते घरी अगदी वर घरी आणून देतात इतकेच नव्हे तर घर बंद असेल तर फोन करून विचारतात….कोणाकडे देऊ म्हणून…आणि मग बाजूच्या आणि समोरच्या दोन्ही वहिनी कोणतीही तक्रार न करता आलेले पार्सल घेतात ते ही कौतुकाने हे विशेष….. स्पर्श नावाचा अजून एक दिवाळी अंक असतो त्यात आपण कथा,कविता, लेख यांचे ऑडिओ करून पाठवायचे आणि त्याचा सुंदर अंक…त्या ही अंकात गेली तीन वर्षे माझ्या कवितांचा समावेश आहे…. काही असो या दिवाळी अंकांनी एक छान ओळख मिळवून दिली…त्या निमित्ताने साहित्यिकांची ओळख झाली……लेखणाला प्रेरणा मिळाली कारण या वर्षीच्या दिवाळी दिवशी सगळे फिरायला गेल्यानंतर जो वेळ मिळतो तेव्हा दिवाळीच्या मुहुर्तावर एक कथा लिहायची पुढच्या दिवाळी अंकासाठी हा माझा नेहमीचा नेम गेली 18 वर्षे नियमित सुरू आहे…….. मला जगण्याचे बळ देणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून सजणारे दिवाळी अंक नेहमीच माझे सोबती आहेत.