बृहन्मुंबई महानगरपालिकाजनसंपर्क विभाग

वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
प्रशासकीय विभागनिहाय समन्वय अधिकाऱयांची नेमणूक करुन सक्त देखरेख करावी
महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांचे निर्देश

वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात
घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्याहीपुढे
जावून व सखोल अभ्यास करून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना वेळीच कराव्यात. वातावरणीय
जोखमींचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करून हरित दृष्टिकोन विकसित करावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त
तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने (वॉर्ड)
आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजानुरुप उपाययोजना आखाव्‍यात, उपाययोजनांची
प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व देखरेखीसाठी समन्वय अधिकाऱयांची नेमणूक करावी, असे निर्देश देखील श्री.
गगराणी यांनी दिले आहेत.
‘वातावरणीय बदल: हरित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज’ या विषयावर महानगरपालिका आयुक्‍त तथा
प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्‍यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात काल (दिनांक २४ सप्टेंबर
२०२४) बैठक पार पडली. त्यावेळी श्री. गगराणी यांना विविध निर्देश दिले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, उप आयुक्‍त (घनकचरा व्यवस्थापन)
श्री. संजोग कबरे, उपआयुक्‍त (उद्याने) श्री. किशोर गांधी, उपआयुक्‍त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) श्री.
मिनेश पिंपळे, उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) श्री. यतिन दळवी, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्‍हास महाले,
संचालक (नियोजन) श्रीमती प्राची जांभेकर यांच्‍यासह सर्व परिमंडळांचे उपआयुक्‍त, २४ प्रशासकीय विभागांचे
सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, तसेच पर्यावरण व वातावरण बदल क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस
उपस्थित होते.
महानगरपालिकेच्‍या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून
त्यावर एकसंघपणे काम करणे, जेणेकरून मुंबईला अधिक पर्यावरण स्नेही आणि वातावरण अनुकूल शहर बनविणे हा या
बैठकीचा मुख्य उद्देश होता. त्याचप्रमाणे गत काही कालावधीपासून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी होत असलेल्या
उपाययोजनांचा आढावा घेवून, या उपाययोजना तसेच प्रमाणित कार्यपद्धती व नियमांचे पालन होत असल्याची
सुनिश्चिती करणे, समन्वय अधिकाऱयांची प्रशासकीय विभाग (वॉर्ड) निहाय नियुक्ती करणे, बांधकामाच्या ठिकाणांची
तपासणी करून तेथे सर्व नियमांचे पालन होत असल्याची सुनिश्चित करणे, या विषयावरदेखील बैठकीत चर्चा करण्यात
आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, वातावरणातील
बदलांमुळे मुंबई महानगरासह संपूर्ण मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचे यापूर्वी
आढळून आले आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावते, असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा
हिवाळा सुरु होण्यापूर्वी वेळीच सजग राहून उपाययोजनांना वेग देणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे
आढळून आल्यास त्यास प्रतिबंध करण्याच्यादृष्‍टीने प्रभावीपणे उपाययोजना अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मुंबई
महानगरात वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱया जोखमींचा सातत्याने आढावा घ्‍यावा, असे निर्देश त्‍यांनी पर्यावरण
आणि वातावरणीय बदल विभागास दिले. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांमध्ये पर्यावरणीय
जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे, असेदेखील डॉ. (श्रीमती) जोशी यांनी नमूद केले.

उप आयुक्त श्री. पिंपळे यांनी, वायूप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणांवर सक्त निरीक्षण,
उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखणे आणि इंधन म्हणून लाकडाचा वापर यासारख्या स्रोतांवर तातडीने कारवाई
करण्याचे महत्त्व पटवून दिले. मुंबईत वायू गुणवत्ता खालावलेल्या दिवसांची संख्या वाढत चालली असल्याने तत्काळ कृती
करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. वायू प्रदूषणामुळे जन्माच्या वेळी कमी वजन, अकाली जन्म आणि
दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. तसेच हृदयविकार, न्यूरोलॉजिकल
समस्या, अस्थमा आणि इतर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा परिणाम तात्कालिक नसून दीर्घकालीन
असल्याने नागरिकांनी देखील आपापल्या स्तरावर उपाययोजना करुन महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार
लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.


Share