मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंद

विद्युत तारा उघड्यावर,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

माणगाव, (सलीम शेख) -माणगाव शहरातील नेहमी गजबजलेला मोर्बा रोड येथील गेले दोन महिने महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालय ते दिनेश पवार यांच्या इमारतीच्या 500 मिटर अंतरातील सुमारे 20 विद्युत खांबावरील पथ दिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत असल्याने या परीसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दिघी – माणगाव-पूणे हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय ते दिनेश पवार यांच्या इमारती पर्यंत जमिनीखालून महामार्गावरील पथदिव्यांसाठी विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र हे पथदिवे कधीच कायम स्वरुपी प्रकाशले नाहीत. कधी मंद तर कधी बंद अशी अवस्था झाली होती. आता तर हे पथदिवे दोन महिने कायम स्वरुपी बंद अवस्थेत आहेत. हि जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची असूनही ते या गैरसोयी कडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत माणगाव नगरपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार आणि फोनवरून संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात. तसेच प्रांताधिकारी माणगाव यांच्या कडेही याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही पथदिव्यांचा प्रकाश पडलेला नाही. विद्युत जोडणी करताना विद्युत तारा जमिनीखालून जोडण्यात आलेल्या नाहीत. त्या प्रवाहित तारा रस्त्यावरून खड्ड्याचा चर न खोदता उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी त्या विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे विजेचा झटका लागून दुर्दैवी घटना घडून नागरिकांचा मृत्यू ओढवला जाण्याची भीती वाटत आहे.

याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने ही आमची जबाबदारी नाही असे सांगून हात झटकले आहेत. काही ठिकाणी या विद्युत तारा वितळलेल्या आहेत. त्यामुळे सिद्धी नगर आणि खांदाड भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. काही वेळा विद्युत दाब कमी जास्त होऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत. पथ दिवे सुरू नसल्याने रात्रीच्या अंधारात चाचपडत जावे लागते. तसेच छोटेमोठे अपघात आणि चोऱ्या होत असतात. काही ठिकाणी विद्युत उच्च दाबाच्या तारा उघड्यावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा मोर्बा रोड दिवस रात्र गजबजलेला असून वाहनांची सतत रहदारी असते.मोर्बा रोड हा शहरातील महत्वाचा मार्ग असून हा महामार्ग म्हसळा,श्रीवर्धन,हरी हरेश्वर,दिवेआगर या पर्यटन स्थळांना जोडला गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत अशी मागणी सिद्धीनगर आणि खांदाड भागातील नागरिकांनी केली आहे.

Share