विशाळगड व गजापूर गावात मस्जिद व मुस्लिम समाज बांधवांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत तळा मुस्लिम समाज  बांधवांचे तहसीलदारांना  निवेदन  

माणगांव, (प्रतिनिधी)-                   विशाळगड व गजापूर गावात मस्जिद व मुस्लिम समाज बांधवांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी  तळा येथील मुस्लिम समाज बांधव अँड.साकिब म्हैसकर, साकिब राहटविलकर, अल्ताफ पठाण, अरबाज गोठेकर, साईम पठाण, साईम खानदेशी, असिफ फटकरे, साकिब अरब, मन्नान फटकारे, अश्रफ तिसेकर आदींच्या टीमने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या माहितीसाठी सदरचे निवेदन शुक्रवार दि.19 जुलै 2024 रोजी  तळा तहसीलदार स्वाती पाटील याना दिले.

सदर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, रविवार दि.14 जुलै 2024 रोजी विशाळगड व गजापूर  जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह,मस्जिदवर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील समाज बांधवांवर भ्याड हल्ला केलेला आहे. तसेच मस्जिदमधील पवित्र मुस्लिम धार्मिक ग्रंथांची विटंबना झाली आहे. मस्जिदीवरील मिनारावर हातोड्याने तोडफोड केली गेली. या हल्ल्यामध्ये दर्गाह,मस्जिदीचे तसेच मुस्लिम घरांचे व दुकानांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. या भ्याड  कृतीचा आम्ही सर्वप्रथम तीव्र निषेध करतो व हि कृती करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांचा धिक्कार करतो.

विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही.  विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गाह हे सर्वधर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे. येथील  हजरत मलिक रेहान  बाबांच्या दर्गाह वर हिंदू,मुस्लिम भाविकांची निस्सीम भक्ती आहे. येथिल दर्गाह हि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळगडावरील पवित्र दर्गाहवर दगडफेक केली. हे वाईट कृत्य करून देखील गप्प न राहता दंगेखोरांनी विशाळगडाहून परताना गडाशेजारील गजापूर या गावामधील मस्जिद तसेच मुस्लिम लोक गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. हे कृत्य अत्यंत निदनीय व बेकायदेशीर आहे. यामुळे महाराष्ट्रातील फक्त मुस्लिमच नाही तर हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्गाहवर भक्ती असलेल्या सर्व भक्तगणांचे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी असे अघोरी कृत्य करणाऱ्या जातीयवादी लोकांवर कारवाई करण्याची मागणी तळा येथील मुस्लिम समाज बांधवानी केली आहे.

Share