22 जानेवारी 2025

स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांची जयंती निमित्त कार्याचा उजाळा

ॲड. सुधाकर सावंत यांनी दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक्स असोसिएशन लि. या संस्थेचे 1983-84 ते 1987-88 या कालावधीमध्ये 5 वर्षे संचालक म्हणून काम केले होते. तसेच या असोसिएशनच्या नागरी बँक मंडळाचे अध्यक्षस्थान सन 1987-88 मध्ये त्यांनी भूषविले होते. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. च्या संचालक मंडळावर देखील 1992-93 ते 1996-97 या 5 वर्षांच्या कालावधीत त्यांनी संचालक म्हणून काम केले होते. या असोसिएशन आणि फेडरेशनच्या माध्यमातून सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी विशेष लक्ष दिले आणि विशेषतः नागरी बँकांच्या समस्या मार्गी लावण्याच्या कार्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

आय. आय. एस. टी. इन्फोटेक प्रा. लि. नाशिक या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सहकारी बँकांतील 10 आदर्श संचालक निवडून आदर्श संचालक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2000 मध्ये ॲड. सुधाकर सावंत यांना हा आदर्श संचालक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सहकार क्षेत्राप्रमाणेच राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही ॲड. सावंत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळेच फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक बिझनेस एक्सप्रेसच्या वतीने ॲड. सुधाकर सावंत यांना राज्यस्तरीय विशेष सेवा श्री 2000 पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिवस्मृती विचार मंच या सेवाभावी संस्थेचे ॲड. सुधाकर सावंत हे अध्यक्ष होते. हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांवर मात करून लग्न विधीसाठी होणाऱ्या अफाट खर्चाला फाटा देऊन वधू-वरांचे सामुदायिक विवाह त्यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु नारायण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मोफत उरकून देण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षे केले. ही त्यांची सामाजिक बांधिलकी होती.

महाड नगर पालिका क वर्गात असूनही अनेक मान्यवर विभूतींनी पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यावेळी नगर पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी महाडमधील नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्याचे सत्कार्य केले. स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांनी महाड शहरामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील अण्णासाहेब सावंत यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे त्यांना महाड नगरीचे व नगर पालिकेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आणि ते सत्य आहे.

महाड नगर विकास आराखड्याच्या (डी. पी.) शासकीय कमिटीमध्ये त्यांना घेण्यात आले. स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांनी दूरदृष्टीने अनेक शहर विकास आराखड्यात सूचना करून अनेक रस्ते, बगीचे, सामाजिक सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत (म. न. पा.), बेरोजगारांना गाळे, निरनिराळ्या पाणी योजना, आरोग्य केंद्र अशा अनेक योजनेचा समावेश केला. यामुळे आज महाड शहर सुनियोजित व सुविधांनी युक्त असे वाटचाल करीत आहे.

सन 1967 ते 1975 या कालावधीत ते महाड नगर परिषदेच्या विविध विषय समितीचे चेअरमन होते. तसेच 1985 ते डिसेंबर 1996 आणि 2002 पासून महाड नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. महाड नगर परिषदेने शहराच्या विकासाच्या कामांमध्ये उल्लेखनीय झेप घेतली आहे. नगर विकासाची कामे प्रभावीपणे पार पाडणारी अग्रगण्य नगर परिषद असा नावलौकिक महाड नगर परिषदेस स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या मौलिक कार्यामुळे प्राप्त झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक योजना त्यांच्या कारकिर्दीत फलद्रुप झाली.

स्वर्गीय अण्णासाहेब सावंत आणि बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची उत्तम प्रगती झाली आहे. बँकेची प्रशासकीय इमारत लोकार्पण झाली आहे.

स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

श्री. रमेश ऊर्फ काका वैष्णव

Share