स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे ‘स्वच्छता ही सेवा’ राज्यस्तरीय अभियानाचा प्रारंभ
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलीत म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण खूप कमी झाले आहे. याकामी स्वच्छता कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी काढले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित, दिनांक १७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान “स्वच्छता ही सेवा अभियान २०२४” या पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज (दिनांक १९ सप्टेंबर २०२४) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, प्रधान सचिव (नगर विकास) डॉ. के. एच. गोविंदराज, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती अश्विनी जोशी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. संजोग कबरे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. प्रशांत तायशेटे, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. शरद उघडे, सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. जयदीप मोरे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या अभियानासाठी कार्यक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग, विविध प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) मिळून सुमारे १ हजार कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत ३ महाराष्ट्रीय बटालियनचे २५० विद्यार्थी, मारवाडी विद्यालय, जे. जे. गर्ल्स हायस्कूल, सेंट झेवियर्स स्कूल (गोरेगाव) चे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या स्वच्छता मोहिमेसाठी ४ डंपर, ४ जेसीबी, ३ मिनी कॉम्पॅक्टर, ४ लहान वाहने, बीच क्लिनिंग मशीन (१), बॉब कॅट मशीन आदी संयंत्रांचा वापर करण्यात आला. स्वराज्यभूमीवर राबवलेल्या या उपक्रमातून सुमारे ३० मेट्रिक टन कचरा संकलन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायली हवी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रिड्युस, रियूज, रिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमअंतर्गत वृक्षारोपण आणि सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहतील, याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात दीड लाख झाडे लावली आहेत. या अभियानामध्ये ९,३५९ कार्यक्रमाची नोंदणी झाली आहे. क्लिनलीनेस टार्गेट युनिट (सीटीयू) अंतर्गत ४५२० ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे ४१११ कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून बीच क्लिनिंग मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरी केली.
***