आपल्या विजयी चौकारात सर्वांचा वाटा :आ. भरतशेठ गोगावले
महाड, (प्रतिनिधी)- महायुतीतील घटक पक्षासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, माझे कुटुंबिय व महाडकर जनतेचे आपल्या आमदारकीच्या विजयी चौकारात योगदान असून रायगड जिल्हयात शिवसेनेने तीन जागा घेतल्याने महायुतीतील मोठा भाऊ म्हणून रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच असेल असा विश्वास महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या निवडणुकीत आम्हाला किमान 35 हजारांचे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र विशिष्ट समाजाने मला मतदान न केल्याने हे मताधिक्य कमी झाले. तरी आतापर्यंतच्या विजयातील हे मताधिक्य अधिक आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्ष, शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अपार मेहनत घेतली. आपल्या कुंटुंबियांनी देखील प्रचारात मोठा सहभाग नोंदविला त्यामुळे हा विजयी चौकार मारणे आपल्याला सोपे गेल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या विजयात अदृश्य हातांचाही मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्रीपद दिले जात नसल्याने एकनाथ शिंदे हे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नाराज असल्याची आवई माध्यमांनी उठवली आहे. पाच दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेवून त्यांनी भाजपा याबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चामध्ये काही तथ्यं नाही अशी स्पष्टोक्ती आ. भरतशेठ गोगावले यांनी दिली.निवडून आल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याऐवजी स्वतः सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला होता. मात्र ते सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजेत यासाठी आम्ही (शिवसेना आमदार) आग्रही असून त्यांची समजूत काढीत असल्याचे आ. गोगावले
म्हणाले.पराभवानंतर उद्धव ठाकरे काय म्हणतात, संजय राऊत काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही. आता विरोधक मतदान यंत्रांबद्दल शंका उपस्थित करित आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांना मोठे यश मिळाले. त्यावेळेस आम्ही असा कोणता आक्षेप घेतला नव्हता. आता पाच वर्ष त्यांनी आक्षेप घेत रहावे आम्ही आमचे काम करित राहू असे आ. गोगावले म्हणाले.
विकासाला गती
या निवडणुकीपूर्वी महाड विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी आपण साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून प्रस्तावित असलेली कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेले धरण प्रकल्प , जलजीवन मिशन योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून ती कामे सुरु करण्यावर आपला भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. महाड मतदार संघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर आपण भर देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. महाड शहराला असलेला पुराचा धोका कमी करण्यासाठी नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम यावर्षी पुन्हा सुरु करण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. रोजगाराच्या मुद्यावर आपण भर देणार आहोत. येत्या काही दिवसांतच दिडशे तरुणांना कारखान्यांमध्ये कायम स्वरूपी सामावून घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.