कार्टून एखादा सिनेमा खूप चालला की मग लगेच तशाच पठडीतले सिनेमे अगदी आशय विषय तोच किंवा तसच घेऊन अनेक लोक सरसावतात. काय तर म्हणे हल्ली तसा ट्रेंड आहे.

किंवा पब्लिकला तेच हवंय, असा चक्क आग्रह किवा समज पसरवून सिनेमा माध्यमातून गल्ला भरू इच्छितात. सिनेमा म्हणजे केवळ प्रबोधन नव्हे तर धन हा शब्द बहुमोल ठरतो. म्हणून जमेल ते व तसे रचून गल्ला भरणे योग्य वाटते का? हे काल्पनिक नव्हे तर आजही असेच घडत आहे. म्हणूनच उत्कृष्ट दर्जाचा मनोरंजक सिनेमा आज येतच नाही.

ह्याच पठडीतले किंबहुना काहीसे खरे अन बहुतांशी भ्रामक चित्र म्हणजे कार्टून होय. कार्टून हा शब्द ऐकताच माणूस उत्सुकतेने त्याकडे पाहू लागतो. पूर्वीच्या काळात टॉम अँड जेरी हा संवाद नसलेला दहा मिनिटांचा कार्टून सिनेमा टेलिव्हिजनवर पहायला मिळत असे. त्यातील मांजर-उंदीर आकाराने दोघेही विक्षिप्त. बुद्धीला न पटणारे. पण त्यांच्यातली एकूण कथानक पाहून पोट धरून हंसु येतेच. त्या दोघांतील जगण्याची एकूण समस्या म्हणजे काय? तर पावाचा एक लोफ, त्रिकोणी चीजचा तुकडा…आणि ते सर्व आपल्यालाच मिळावे, शिवाय त्या उंदीर मामाला अजिबात मिळू नये, असं हे अकल्पित कथानक! दोघांच्या राहणीमानातले अंतर अशा बारीकसारीक घटनांनी रंगवून दाखवणारा तो रंजक सिनेमा म्हणजे टॉम अँड जेरी. दोघांत असलेली जगण्याची रेस, जिद्द आणि त्यातही गंमत म्हणून मजेशीर किस्से हे सर्व छोट्या पडद्यावर पाहतांना माणूस त्या चौकटीत पार गुंतला जायचा. आणि आजही त्याची एक झलक पाहताच डोळे अन मन टीव्हीच्या चौकटीत नकळत रमून जातं. पांच ते सत्तर वयातले सारे बच्चेकंपनी अशा कार्टूनचे दिवाने आजही आहेत. आतांतर टेलिव्हिजन चौकटी पेक्षा लहान असलेला चौकोन म्हणजेच टच स्क्रीन अँड्रॉईड मोबाईल खिशात आला आहे. तद्नंतर मिडिया नव्या अवतारत दिसू लागला. पेपरातील चिंटू चक्क डिजिटल झाला. अनेक किस्से कहाण्या रचवून विविध नावाने कार्टून फिल्म्स येऊ लागल्या. पूर्वी मटात “कसं बोललात” म्हणून आर.के. लक्ष्मण यांचे अभ्यासपूर्ण स्केचिंग असायचं. त्या दिवशीच्या अंकातली न्यूज हेडिंग आणि त्यांस समर्पक असे श्री लक्ष्मण यांनी रेखाटलेले कार्टून! एकदम परिणामकारक आणि वस्तुस्थिती सांगणारं असायचे.

कार्टून म्हणजे केवळ मिश्किली नव्हे. कार्टून हा एक आर्ट होता व तो आजही आहे. प्रिंट मिडियातले आवाज, बुवा हे मराठी दिवाळी अंक विनोदी लिखाणासाठी महशूर आहेत. त्यातही मुखपृष्ठावर कार्टून शिवाय अंक नाही. वाचक त्यांतील स्केच केलेली कार्टून्स आजही फेमस आहेत. कार्टून हा मानवी मनाचा स्वतःशी केलेला आत्मिक संवाद होय, असे अनुभवातून सांगत आहे.सध्या दाखवायचा विनोद फारच फोफावला आहे. मराठीत तर त्याचे पेव दिसते. काही प्रमाणात तो उच्च स्तर गाठतो तर काही वेळा तो बटबटीत वाटू लागतो. पण हिंदी चित्रपट निर्मिती पेक्षां मराठी विनोद जास्त खरा वाटतो आणि तो नक्कीच उजवा वाटतो. “मी विनोद सांगतो तुम्हीं हंसा!” मग तो विनोद काय दर्जाचा असू शकेल? हे ज्याचे त्यांनी ठरवावे. मराठी सिनेमातला विनोदी बादशाह अशोक सराफ आहे, यांत कुणाचे दुमत नसावे.

गतकाळातील सिने नायक दिलीप कुमार यांनी आपल्या प्रेस मुलाखतीत एका प्रश्नाचे उत्तर फारच विनोदी आणि मिश्किल शब्दांत सांगितले होते.
प्रश्न – फावल्या वेळात तुम्ही काय करता?

उत्तर – मी लॉरेल हार्डी आणि टॉम अँड जेरी कार्टून आवडीने पाहतो. त्यामुळे खूप मनोरंजन होते. मेंदू तरल होतो. स्वतःशी बोलता येते! त्यांनी काम केलेले सिनेमे म्हणजेच comedy via tragedy असा झालेला प्रवास होय. आझाद, लीडर, राम और श्याम असे निवडकच पण आठवणीत जाऊन वसलेले चित्रपट अफलातून विनोदाची धारदार कमाल! असंच म्हणावं लागेल.पुढे तत्कालीन देव आनंद आणि राजकपूर हे दर्जेदार कलाकार आज हयात नसतील पण त्यांचे मनोरंजक सिनेमे लाजवाब होते. देव आनंद यांना विनोद विशेष नाही जमला, पण राजकपूर हे हिंदी सिनेमाचे तत्कालीन आणि एकमेव शोमन म्हणून सर्वानां ज्ञात आहेत. दिलीप, देव यांचे अनुकरण करणारे हिंदी सिने इंडस्ट्रीत अनेक झाले पण राजकपूर सारखा नायक खुद्द राकपूरच होय. स्वतःवर विनोद करण्याचे कठिण काम त्यांनी मेरा नाम जोकर मध्ये करुन उशिरा का होईना लोकांची वाह वाह मिळवली. राजकपूर सारखी अदाकारी आजवर कुणी केली असेल असे नाही वाटत. अनिल कपूर या कलाकाराने एका चित्रपटात प्रयत्न केलेला आठवतो. एव्हढेच!

कार्टून हे इतके प्रभावी माध्यम अजूनही लोक आवडीने पाहतात.. त्यांत नवनवीन सुधारणा होत आहेत हेही लक्षात येते. लोक त्यांस स्वीकारतात. कार्टून या माध्यमातून समाज प्रबोधन साधता येते. सिनेमा पेक्षा कमी खर्चात तयार करता येत असल्या मुळे अनेकजण या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत आहेत.छोटाभीम ही कार्टूनची मालिका घराघरांत पोहोचलेली आहे. त्याचे संवाद, पार्श्वसंगीत, त्यांतील इतर पात्रं, रंजक सिनेमाटोग्राफी, देण्यांत आलेला उसना आवाज, पार्श्व संगीत. इत्यादी मस्त जमून जाते. त्याच्या तुलनेत इंग्लिश कार्टून्स जास्त गतिमान आहेत. म्हणूच बच्चा कंपनी बेहद्द खुश असते.जेणेकरून कार्टून हा विषय खूपच जास्त प्रमाणात प्रगत झाला आहे. आणि त्याचा चाहता वर्ग सगळीकडे आहे.जागतिक पातळीवर त्यांस लोकाश्रय मिळाला आहे. जगात मनोरंजन क्षेत्रातील सर्वात जास्त स्वीकारला गेलेला नामांकित विषय म्हणजे कार्टून आहे, हे सारेच मान्य करतील.महाराष्ट्राची हास्य जत्रा एक सजीव मराठी विनोदी कार्यक्रम सध्या खूपच गाजतोय. उत्तम लिखाण आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे महानायक सुद्धा स्तिमित होऊ शकतात, हिच तर खरी शक्ती आहे विनोदात!

Share