चालक-वाहकांना पत्करावा लागतो प्रवाशांचा रोष
महाड, (संजय भुवड) – महाड एसटी आगारात असणाऱ्या शिवशाही बसेस मेंटेनन्स अभावी चालवण्या लायक राहिल्या नसून, लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या या बसेस वाटेतच नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या बस चालवणाऱ्या चालक-वाहकांना प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महामंडळाच्या सेवेत शिवशाही बसेस दाखल केल्या. मात्र वेळच्या वेळी होणाऱ्या दुरुस्ती अभावी, या बसची दुरावस्था झाली आहे. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज वेगवेगळ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाकडून “साध्याच बस बऱ्या” असे बोलले जात आहे.
महाड आगारात ८ शिवशाही बस असून, या बसेस मुंबई, बोरीवली, ठाणे मार्गावर धावत असतात. रोजच्या रोज या बसेसचे मेंटेनन्स केले जात नसल्याने नेहमीच या बस कधी वातानुकुलीत यंत्रणा बंद पडणे, कधी दरवाजा उघडझाप न होणे, तर कधी गियर न पडणे अशा तक्रारींमुळे वाटेतच थांबवाव्या लागतात.
बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी बस नं. ५३२, ही बसचे गिअर पडत नसल्याने निर्धारित वेळेत सुटली नाही. बस फलाटावर लावल्यानंतर चालकाच्या गिअर पडत नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे त्यांनी कार्यशाळेतील मॅकॅनिक बोलावून गिअरचे काम करून घेतले. कार्यशाळेतून बस चालकाच्या ताब्यात देण्यापूर्वी ती सुस्थितीत आहे की नाही, हे तपासूनच देणे गरजेचे असतानाही, अनेक वेळा नादुरुस्त बस चालकाच्या ताब्यात देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू असतो.
गिअरचे काम करून ही बस जेमतेम दस्तुरी नाक्याच्या पुढे गेली, असता बसचा दरवाजा उघडझाप होत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे दरवाजा उघडझाप करण्यासाठी वहूर येथे पोहोचण्यास या बसला पाऊण तास लागला. त्यानंतर पुन्हा गिअर पडत नसल्याचे लक्षात आल्याने चालकाने बस पुढे मार्गस्थ करण्यास नकार देऊन दुसरी बस पाठवण्याचा आग्रह केला.
सकाळच्या या गाडीने नोकरदार मंडळी कामावर जात असतात. त्यामुळे ही बस नेहमीच फुल असते. दुसरी बस किमान एक-दीड तासाने आल्याने अनेक नोकरदारांना मिळेल त्या बसने अथवा खासगी गाडीने प्रवास करावा लागला.
प्रवाशांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी आगार व्यवस्थापनाने शिवशाही बसेस सुस्थितीत करून घ्याव्यात. बसचे होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.