तळ्याच्या काठावर घेतला कविता अध्यापनाचा अनुभव
महाड, (प्रतिनिधी) -इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील नाकेबंदी या काव्यसंग्रहातील ज्येष्ठ कवी ज. वि.पवार लिखित तू झालास मूक समाजाचा नायक या चवदार तळ्यावर आधारित कवितेचे महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या काठावर विषय शिक्षक श्री. गंगाधर साळवी सर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुर्डूनकर सर यांच्या परवानगीने प्रत्यक्ष भेट घेवून अध्यापन केले. यावेळी दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आलेला अनुभव अवर्णनीय होता. ज्या पायऱ्यांनी उतरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले होते ते ठिकाण विद्यार्थ्यांनी पाहिले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
प्रत्यक्ष चवदार तळ्याच्या ठिकाणी कविता शिकवल्यामुळे अध्यापन प्रभावी झाले. विद्यार्थ्यांच्या कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखा हा क्षण होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
कवितेचे अध्यापन चालू असताना महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले भीमा अनुयायी स्तब्ध उभे राहून अध्यापन ग्रहण करीत होते. यावेळी काही अनुयायांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप देखील केले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीस्तंभावरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील भव्य नाट्यगृह विद्यार्थ्यांनी पाहिले. स्मारकातील भव्य ग्रंथालय,सुसज्ज अभ्यासिका वर्ग यांना भेट दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय देखील पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आणि अर्धाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन केल्यानंतर हुतात्मा स्मारकातील हुतात्म्यांना वंदन करण्यात आले. यावेळी 10 सप्टेंबर 1942 च्या किसान क्रांती मोर्चात शहीद झालेल्या हुतात्मा कमलाकर दांडेकर, वसंत दाते, नथू टेकावले, विठ्ठल बिरवाडकर, अर्जुन भोई कडू या हुतात्म्यांना विद्यार्थ्यांनी वंदन केले. शेजारी असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानात जिजाऊंना वंदन करून उद्यानात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. त्यानंतर शिवकालीन ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात विद्यार्थ्यांनी वीरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. कविता अध्यापदाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे महाड दर्शन देखील झाले. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आणि मराठी विषय शिक्षक श्री. गंगाधर साळवी सर यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगितले.