Danish naeem lambe

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

मुंबई, दि.  १२ : लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष लोकअदालत २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. यामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी https://legalservices.maharashtra.gov.in/  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा वकिलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.

संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसात) पुढीलप्रमाणे :  अकोला  (८५९१९०३९३०), बीड (८५९१९०३६२३), चंद्रपूर (८५९१९०३९३४), गोंदिया (८५९१९०३९३५), कोल्हापूर (८५९१९०३६०९), नांदेड (८५९१९०३६२६), धाराशिव (८५९१९०३६२५), रायगड (८५९१९०३६०६), सातारा (८५९१९०३६११), ठाणे (८५९१९०३६०४), यवतमाळ (८५९१९०३६२९), अहमदनगर (८५९१९०३६१६), अमरावती (८५९१९०३६२७), भंडारा (८५९१९०३९३६), धुळे (८५९१९०३६१८), जळगाव (८५९१९०३६१९), लातूर (८५९१९०३६२४), नंदुरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२), रत्नागिरी (८५९१९०३६०८), सोलापूर (८५९१९०३६१३), वर्धा (८५९१९०३९३२), मुंबई (८५९१९०३६०१), छत्रपती संभाजीनगर (८५९१९०३६२०), बुलढाणा (८५९१९०३६२८), गडचिरोली  (८५९१९०३९३३), जालना (८५९१९०३६२१), नागपूर (८५९१९०३९३१), नाशिक (८५९१९०३६१५), पुणे (८५९१९०३६१२), सांगली (८५९१९०३६१०), सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७), वाशीम (८५९१९०३९३७) आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

000

संजय डी ओरके/वि.सं.अ.(विधी व न्याय)

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, दि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र सरकारच्या या निर्णयावर आधारित राज्यात मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विकास विभागामार्फत  ग्रामीण व शहरी रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’  सुरू केली जात आहे.

राज्यातील युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन  रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन मैदान येथे १३ जुलै रोजी सायंकाळी  ५.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी शासन त्यांच्यासोबत आहे. १२ वी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण यामधील युवकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. उद्योजक आणि बेरोजगार युवकांमध्ये  संवाद निर्माण करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील असावे, उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये, आयटीआय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. तसेच कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने असणार आहे. या योजनेचा युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. प्रभात लोढा यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

०००