Articles

निसटलेले क्षण….

कधी कधी असे घडते,अगदी आपण लिफ्टच्या बटणाजवळ जावं आणि पटकन लिफ्ट वरती जावी त्या वेळी जे फिलिंग असते ना ते खूप विचित्र असतं ..असं खूप काही घडत असतं..अजून एकदा मी टीव्ही सुरू केली म्हटलं आज रविवार आहे बरच काही बघू तर टीव्हीवर मेसेज आला की वर अकाउंट हॅज बीन सस्पेंडेड……. खरंच आणि मग विचार चक्र फार वेगाने फिरू लागली, खरंच काय अर्थ असतो हो माणसाच्या आयुष्याला,जगण्याला.. जन्म आहे तिथे मरण आहे.. जन्मणारा प्रत्येक जीव मरणाचे रिटर्न तिकीट घेऊनच जन्माला आलेला आहे हे शाश्वत सत्य आहे पण जो काही जीवनप्रवास आहे तो जगताना कुठेही निराश न होता जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हे मात्र खरं आहे,परवा मी एक वाक्य ऐकलं,“ पैशाशिवाय जीवनाला अर्थ नाही.“खरंच पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? पैशाची गरज आहेच पण त्याही पलीकडे थोडा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे आपण स्वतःहून जेवढे आनंदी जगू शकू आनंदी राहण्याचा प्रयत्न करू ते खूप महत्त्वाचे आहे कारण जीवनामध्ये आपण पैसे वाटू शकत नाही,वाटतो का आपण पैसे? अजिबात नाही पण जीवनामध्ये आपण आनंद सगळ्यांना वाटू शकतो.या दोन गोष्टींमधला हा फरक आहे……….. पैसा वाटला तर संपून जाईल पण आनंद वाटला तर तो द्विगुणीत होईल हे समीकरण आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज आहे हे मान्य आहे, जगण्यासाठी पाठबळ हा पैसा देतो हे जरी वास्तव असलं तरी आपण जेवढे आनंदी असतो,जेवढे सकारात्मक असतो,जर आपला दूरदृष्टीकोन जर स्वच्छ असेल तर जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो हेही वास्तव आहे……अगदी महागड्या चार चाकी गाडीतून फिरावं,उंची दागिने घालावेत,उंची कपडे वापरावेत,इम्पोर्टेड वस्तू वापराव्यात,चारचौघांमध्ये वावरताना दहा-बारा तोळे सोनं अंगावरती असावं असं जरी खूप वाटत असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इतकं सगळं असूनही आपण सुखी समाधानी असतो का? आपल्याला अगदी शांत झोप लागते का? नाहीच….. कारण जर पैसा असेल तरीही आपल्याला चिंता सतावत असते आणि पैसा नसला तरी आपल्याला चिंता सतावत असते पण आपली सगळीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही…. ठीक आहे नाही स्वप्न पूर्ण होत तर आपण त्या स्वप्नांच्या जवळ जाण्यासाठी वेगळाच  प्रयत्न कशासाठी? समोर जे जीवन आहे समोर जे वास्तव आहे ते स्वीकारून जर आपण जगायला शिकलो ना तर खरंच आपण जग जिंकलं असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही असंच आहे जीवन….  पण आपल्याला समोरच्याला दाखवायचं असतं आपल्याकडे किती महागड्या वस्तू आहेत ,आपण किती चैनीत राहतो. खुषीत राहतो..आयुष्यभर आपण आरामात राहतो पण सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी हे सगळं करण्याची गरज आहे असं अजिबात नाही…. दिखाऊपणा कशासाठी पाहिजे? तुम्ही जर प्रामाणिकपणे जगत राहिलात ना तर दिखाऊपणाच्या वेगळ्या झगमगाटापुढे तुमचं वास्तव हे झळाळून निघेल यात शंकाच नाही. महालात राहणारा अतिशय श्रीमंत माणूस आणि झोपडीत राहणारा अतिशय गरीब माणूस यांची तुलना, यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही,पण ज्या वेळेला महालातील श्रीमंत माणसाला अगदी मऊ गादीवरती ही झोप येत नाही तेव्हा तो गरीब माणसापेक्षाही गरीब होतो आणि जेव्हा झोपडीतील माणूस अगदी जमिनीवर अंथरलेल्या चटई वरती ही शांत निद्रा घेतो तेव्हा तो झोपडीतला माणूस बंगल्यातील श्रीमंत माणसापेक्षाही श्रीमंत होतो हे साधं सोपं सरळ जीवनाचं तत्वज्ञान आहे,अगदी आपल्याला अमाप पैसा मिळवण्याच्या मागे न लागता जरुरीपुरता पैसा असणं गरजेचं आहे तो घेऊन आपण जर जगत राहिलोत तर ऐश्वर्या पेक्षाही मौल्यवान असणारं समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या जगण्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होईल यात तीळमात्र ही शंका नाही. जगणं खरंच सुंदर आहे ते अधिक कसं सुंदर होईल त्यासाठी आपण नेहमीच झटत राहिलं पाहिजे जसे कवी केशवसुत म्हणतात,या सुंदर जीवनाला आपल्याला सजवता आलं पाहिजे, स्वतःला किती सजवावं, स्वतःला किती दागिन्यांनी मढवाव यापेक्षा आपलं जीवन किती छान पद्धतीने सजवावं हे अतिशय महत्त्वाच आहे आणि ज्या व्यक्तीला हे जीवनाचे तत्व कळलं तो आयुष्यभर जीवनात आनंदीच राहणार आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून समोर पाहणार आहे आणि दूरदृष्टीकोन ठेवून जीवनाच्या योजना आखणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे,शेवटी कसं आपलं जीवन हे आपल्यालाच जगायचं असतं..मी माझी एक मैत्रीण पाहिली कॉलेजमधली अतिशय देखणी अगदी म्हणजे सर्वगुण संपन्न पण ती हुशार नव्हती,बाकी सगळं तिच्याकडे होतं,ती ऐश्वर्या संपन्न होती लग्नानंतर ही ती एका श्रीमंत घराची सून झाली तिला अगदी आयुष्याला मस्त जगायची सवय होती, लग्नाआधीही तिला व्यवस्थित बसून चित्रपट पाहायला आवडायचे सगळं कसे अगदी व्यवस्थितपणे लागायचं ,लग्नानंतर ही ती तसंच आयुष्य जगत होती.. अगदी आयुष्य आरामात…..पण जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो तेव्हा प्रत्येकाचं विस्तारलेलं कर्तृत्व क्षेत्र पाहताना कुठेतरी वाटलं की आपण यामध्ये कमी पडतोय कारण स्वतःच्या कोषाच्या बाहेर ती कधी पडलीच नाही, म्हणजे अगदी आराम आयुष्य जगणं, गाडीतून फिरणं,दागिने घालून मिरवण….हे सगळं तिच्याकडे आहे, सगळं सुख तिच्या पायाशी लोळण घेते पण जेव्हा ती चार चौघांमध्ये आमच्याच हायस्कूलच्या मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये आल्यानंतर एक गोष्ट तिच्या लक्षात आली की आपल्याकडे सगळं आहे पण आपल्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसतं ही समाधान माझ्याकडे नाहीये हे समाधान आपल्याला शोधता आलं पाहिजे हे समाधान आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळवता आलं पाहिजे तरच जीवन यशस्वी होतं,जीवन सुंदर बनतं,आपल्या जीवनात आपल्याला लोणच्यासारखं मूरता आलं पाहिजे आणि मग सुख दुःख संकट सगळं काही सामावून घेऊन जेव्हा आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती एक तेज असतं,एक आनंद असतो, एक जिंकल्याचा अविर्भाव असतो एक समाधान असतं ते फार महत्त्वाचं असतं कारण तावून सुलाखून निघाल्यानंतर जीवनाचा अर्थ आपल्याला कळत असतो.  म्हणून हे निसटणारे क्षण आपल्याला निसटू द्यायचे नसतात.

अंतरीचे बोल