निवृत चिफ इंजिनियर ( मरीन )
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या “शिरळ” नावाच्या एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात ६५ वर्षा पूर्वी जन्म. आई गृहिणी व वडील स्वातंत्र्य सेनानी असलेले.
प्राथमिक शिक्षण तेथीलच उर्दू शाळेत पूर्ण व माध्यमिक शिक्षण जवळच्याच गांवातील मराठी माध्यमाच्या हायस्कूल मधून उच्च श्रेणी मध्ये पूर्ण.
जिल्ह्यातील पाॅलीटेक्निक मधे मेकॅनिकल इंजिनीअरिंग चे शिक्षण व माझगाव डाॅक मुंबई मध्ये “मरीन इंजिनीअरिंग” चे प्रशिक्षण पूर्ण.
सुरवातीला ज्युनिअर इंजिनियर म्हणून भारतातील सर्वात मोठ्या शिपींग कंपनी मधे सेवेला सुरूवात. काही काळानंतर एका प्रसिद्ध ब्रिटिश शिपिंग कंपनी मधे रूजू. नंतर संधी मिळताच अमेरीकेच्या जगप्रसिद्ध ऑईल एंड गॅस कंपनी मधे सेवेला सुरूवात. निवृत होई पर्यंत सुमारे २५ वर्षें तेथेच सेवावृत.
मर्चंट नेव्ही मधे कार्यरत असताना ऑईल व गॅस क्यारीयर बोटीवरील विशेष अनुभव. तीन लाख टन क्रुड ऑईल किंवा एक लाख चाळीस हजार टन द्रव स्वरूपात गॅस नेऊ शकणाऱ्या प्रचंड मोठ्या व राक्षसी शक्तीच्या इंजिन असलेल्या बोटीवरील विशेष अनुभव.
व्यापारी नेव्ही मधील आपल्या सेवा काळात जगभर भरपूर प्रवास करता आला. या निमित्ताने अविकसीत देश, विकसनशील देश व विकसीत देश जवळून पाहता आले. तेथील भौगोलिक परीसर व जनजिवन, संस्कृती व ऐतिहासिक ठेवा जवळून पहाण्याचा योग आला.
तसेच पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागराचे रौद्र रूप अनुभवायला मिळाले. जसे आकाशातील मनमोहक रंगछटा पहाता आल्या तसेच वादळाचे झटके आणि फटके ही खायला मिळाले.
जगभर भटकंती करत असताना त्या शहरातील वाचनालये बघण्याचा छंद जडला. प्रचंड मोठी देखण्या इमारती असलेली वाचनालये व तशाच प्रकारची मोहक पुस्तकें विक्रीची दुकाने पाहुन मन प्रसन्न होत गेले. त्यातूनच व्यासंगाचा छंद जडला व पुस्तके विकत घेऊन वाण्याची सवय जडली. त्यामुळे स्वतः खरेदी केलेला एक चांगला व प्रचंड मोठा संग्रह तयार झाला.
या संग्रहात उर्दू, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील जग भरातून जमा झालेली पुस्तके आहेत. विषयांचा विचार केला तर या संग्रहात सर्व धर्मातील विशेष धार्मिक पुस्तके, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वैचारिक पुस्तकांंचा ठेवा आहे. काही पुस्तके दुर्मिळ आहेत. यात कादंबरी व ललीत साहित्य नसल्या सारखेच.
यातुनच प्रेरणा मिळवून सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक विषयावर मराठी व उर्दू मधुन अधुन मधुन वैचारिक लिखाण वर्तमान पत्र व नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.
सर्व जात धर्मिय लोकांशी सलोख्याचे संबंध असल्याने परिसरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था व उपक्रमां मधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतोच.
अल्लाह च्या कृपेने श्रवणीय आवाजाची देणगी प्राप्त असल्याने गझल, भावगीते, चित्रपट गीतै, नात व हम्द गायनाची आवड.
पत्नी आमीना तिच्या काळातील उत्कृष्ट खेळाडू व पॅराशुट जंपर व नंतर बॅंकेत नोकरी, सद्या गृहिणी. डाक्टर मुलगी रेडिएशन ऑनकाॅलाजिस्ट, व मुलगा आय आय एम मधुन बिझनेस मॅनेजमेंट चे शिक्षण पूर्ण करून कन्सल्टंट म्हणून सेवावृत्त. दोघेही विवाहीत.
सद्या जास्त काळाचे वास्तव्य ठाणे शहरात असले तरी जन्मभूमी च्या मातीशी व माणसांशी घट्ट व अतुट नाते जपलेले आहे.