रोहा, (सुहास खरीवले) – रोहा तालुका शासकीय व निमशासकीय सेवा निवृत्तांचे संघटनेतर्फे 17 डिसेंबर हा पेन्शनर डे समारंभ रोहा ज्येष्ठ नागरिक सभागृहात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सकल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाई व्ही. टी. देशमुख आणि संघटनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पी. बी. सरफळे रावसाहेब उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांनी प्रथम प्रास्ताविक केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना सरफळे रावसाहेब म्हणाले, “आजचा 17 डिसेंबर हा पेन्शनरांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. याच दिवशी 1982 साली सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला की, पेन्शनरांना पेन्शन देणे हे केवळ सरकारचे औदार्य नसून तो पेन्शनरांचा हक्क आहे.“
तसेच त्यांनी आपले पेन्शन बंद होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगून स्पष्ट केले की, दिवसेंदिवस बदलणारी परिस्थिती व वाढत्या गरजांचा विचार करून शासनाने पेन्शनर व त्यांच्या वारस कुटुंबासाठी अनेक शासन निर्णय निर्गमित केले आहेत. पेन्शन अंशदान कपात व वैद्यकीय भत्त्याच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे, आणि याही मागण्यांना लवकरच मान्यता मिळेल. मात्र, संघटनेतून एकत्र राहणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
या समारंभात वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा (सुनिता बारसकर, सुरेश चाळके, विठोबा दिघे, साधना वालेकर, मारुती जंगम, मंगला राऊत, अरुणा जाधव, शांताराम महाडीक) शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि सन्मानपदक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वैवाहीक जीवनाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा (शरद गुडेकर, जयराम जाधव, विठोबा दिघे, केशव बागुल, मारुती जंगम, काशीराम गोरीवले, गजानन खराडे) सत्कार करण्यात आला.
गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळ व विद्यापीठ परीक्षांमध्ये उच्च श्रेणीत यश संपादन केले त्यांचा गौरव करण्यात आला. यात आदित्य भोई, इशा पाटील, सिया सरफळे, सोहम सरफळे, आर्या गडमुळे, तेजल नील इत्यादी 13 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
प्रमुख अतिथी भाई व्ही. टी. देशमुख यांनी त्यांच्या भाषणात संघटनेचे महत्व आणि एकत्रित राहण्याचे फायदे सांगितले. या समारंभात संघटनेचा जिल्हा ऑडिटर एम. डी. भोईर आणि अपंग सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप ढवळे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
समारंभात श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभ यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव नारायण पाटील, सुधाकर वालेकर, एस. एन. गायकवाड, शरद गुडेकर, अनंत पाटणकर, चंद्रकांत गावडे, चंद्रकांत टिकोणे, भगवान बामुगडे, शरद नागवेकर, शैलजा देसाई, संजीवनी कडपेकर, दिपाली धनावडे, संध्या मळेकर, अक्षता साखळकर, अनुराधा धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश मोरे सर यांनी केले.