स्वतंत्र निधी गरजेचाच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करित या तळ्याचे पाणी दलितांना खुले करुन दिले. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह केला. . 25 डिसेंबर रोजी याच महाडच्या भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना हीन वागणूक देण्याचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन महाडच्या क्रांतीभूमीत केले.या दोन्ही ऐतिहासिक घटनांचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात येतो. केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये येत असतात. ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेबांनी बौद्ध धमाचा स्विकार केला ती नागपूरची दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेबांनी चीर विश्रांती घेतली ती मुंबईची चैत्यभूमी आंबेडकरी अनुयायांसाठी जेवढी पवित्र आहे तेवढीच महाडची क्रांतीभूमी देखील पवित्र आहे. खरं तर धर्म , जात याचा विचार न करता जे स्वतःला केवळ भारतीय समजतात त्या प्रत्येक माणसा साठी नागपूर, मुंबई आणि महाड ही तीर्थक्षेत्रेच आहेत.
महाडला 20 मार्च आणि 25 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येत असतात. महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या या विराट जनसमुदायाचे एकच ध्येय असते ते म्हणजे या महामानवाला अभिवाद. या ध्येयापुढे ते तहान भूक विसरलेले असतात. जागा मिळेल तेथे झोपत असतात. नैसर्गिक विधींसाठी जागा नसल्याने कुचंबणा सहन करित असतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल असलेल्या श्रध्देपुढे या गैरसोयी त्यांच्यासाठी किरकोळ ठरत असल्या, तरी त्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. दुर्दैवाने शासनाला आपल्या या कर्तव्याचा विसर पडला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पशाने पावन झालेली भूमी या एका वाक्याचा वापर करीत महाड नगरपालिकेने या शहराचा विकास करुन घेतला. चवदार तळे परिसराचे सुशोभिकरण करुन घेतले.
जेवढी गर्दी या दोन सोहोळ्यांच्या वेळेस किल्ले रायगडवर होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक गर्दी 20 मार्च आणि 25 डिसेंबर रोजी महाड शहरात होत असते. मग महाड शहराला 20 मार्च आणि 25 डिसेंबरसाठी असा निधी का दिला जात नाही? रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांनी नेमका हाच विषय उपस्थित केला आहे. केवळ पत्रकार संघटनांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी हा विषय घेतलेला नाही. त्यांच्या कुटुंबाला आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील दलितमित्र स्व. महादेव खांबे हे आंबेडकरी चळवळीतील एक सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास देखील लाभला होता.चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन साजरा करण्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तो कार्यक्रम सुरु करण्यात मनोज खांबे यांचे ज्येष्ठ बंधू स्व. सुभाष खांबे यांचे योगदान मोठे होते. मनोज खांबे यांना असलेला हा वारसा विचारात घेता त्यांना चवदार तळे , क्रांतीभूमी संदर्भात अधिकारवाणीने शासनाकडे काही मागणी करण्याचा अधिकार निश्चितच आहे. त्याच अधिकाराचा वापर करून मनोज खांबे यांनी महाड येथे साजऱ्या होणाऱ्या चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनूस्मृती दहन दिनाच्या कार्यक्रमांसाठी दरवर्षी शासनाने दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा आणि अर्थसंकल्पातच त्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शासनाला दिले आहे. मनोज खांबे यांनी केलेली ही मागणी शासनाने मान्य करायलाच हवी. आज राजकीय नेतेमंडळी आणि सरकार देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याखेरीज कोणते काम करित नाही. त्याच सरकारने महाडमध्ये येणाऱ्या आंबेडकरी जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे गरजेची आहे. म्हणूनच मनोज खांबे यांनी जी मागणी केली आहे , त्या मागणीची दखल घेत या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी.