जमातुल मुस्लिमीन मोहल्ला बाजार यांच्याकडून पुस्तकांचे वाटप

मुरूड, (जाहीद फकजी) – मुरुड मध्ये असणारे अंजुमन इस्लाम जंजिरा चे डिग्री कॉलेज यांस जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार मुरुड यांच्याकडून जवळपास पंधरा हजार किमतीचे 80 पुस्तके वाटप करण्यात आली. जमातूल मुसलिमीन बाजार असे उपक्रम नेहमीच राबवीत असते. शाळेत मुलांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांना पुस्तकांची कमी पडू नये या निमित्ताने अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार यांच्याकडून पुस्तके देण्यात आली.

या निमित्ताने एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन डिग्री कॉलेजच्या एका भव्य हॉलमध्ये डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल माननीय साजिद सर यांनी केले होते.या कार्यक्रमांमध्ये डिग्री कॉलेजचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनीनी भाग घेतला होते. या कार्यक्रमांमध्ये डिग्री कॉलेजचे शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व जमातूल मुस्लिमीनचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराच्या नावाने व कुराण पठण करून करण्यात आले. सूत्रसंचलन प्रा. निदा गोडमे याने केले व डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल साजीद सर यांनी प्रस्ताविक केले तसेच जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार चे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष याने आपले मनोगत व्यक्त केले.

महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची युवासेनेच्या

महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती

महाड, (प्रतिनिधी) -टेनिस बॉल क्रिकेटचा बादशहा म्हणून चिरपरिचित असलेला महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची शिवसेना प्रणित युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी नुकतेच त्याला नियुक्तीपत्र प्रदान केले.
योगश पेणकर याने आपल्या टेनिस बॉल क्रिकेटने केवळ महाड किंवा रायगडमध्येच नावलौकिक मिळविलेला नाही तर राज्यात, देशात आणि परदेशातही आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. महाड शहरातील महाबली काँप्लेक्स मध्ये राहणारा आणि महाड औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कारखान्याच्या सेवेत असलेला योगेश पेणकर हा एक व्यावसायिक टेनिस क्रिकेटपटू आहे. स्थानिक पातळीवर तो अफझल इलेव्हन या संघाकडून तर राज्य पातळीवर तो पुण्यातील डिंग डाँग संघाकडून तो नियमत खेळतोच. त्याच्या बहारदार फलंदाजीमुळे राज्यातील इतर अनेक संघांनी त्याला आजवर आपल्या संघातून खेळविले आहे. परदेशातही त्याने आपल्या दमदार फलंदाजीची छाप पाडूली आहे. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील या दमदार कामगिरीची दखल घेत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी त्याची युवा सेनेच्या क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती करित त्याला क्रीडा क्षेत्रात व्यापक काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा समर्थक असलेल्या योगेश पेणकर याने आपल्या या नियुक्तीचे श्रेय एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, आ.भरतशेठ गोगावले आणि युवा सेनेच्या कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांना दिले आहे. या पदावर आपली नियुक्ती व्हावी यासाठी विकास गोगावले यांनी पूर्वेश सरनाईक यांच्याकडे आग्रह धरला होता असे योगेश पेणकर याने आवर्जून सांगितले.

योगेश पेणकर याच्या या नियुक्तीमुळे महाडसह रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील मान्यवरां बरोबरच विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांकडून योगेश पेणकर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युवा सेनेच्या प्रदेश क्रीडा समन्वयकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आ. भरतशेठ गोगावले यांच्या आशीर्वादाने पूर्वेश सरनाईक आणि विकास गोगावले यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पारपाडून युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे क्रीडा वैभव वाढविण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.- योगेश पेणकर

महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयकयुवासेना !क्रिकेटपट्टू योगेश पेणकर यांना राज्यस्तरीय क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात येत आहे. युवासेने तर्फे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात अमूलग्र बदल घडवून आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.- पूर्वेश सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष.

करंजा गावातील 11 वर्षीय मयंक म्हात्रे यांनी रचला नवा इतिहास घारापुरी ते करंजा जेट्टी 18 किलोमीटरचा प्रवास 5 तास 29 मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम

उरण, (विठ्ठल ममताबादे) -उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय 11)याने मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:04 मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर सतत पोहत सकाळी 7 वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे पोहोचला. उरण तालुक्यातील घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी 18 किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडवीला आहे.

11 वर्षीय मयंक म्हात्रे हा सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे. दररोज 5-5 तास तो पोहण्याचा सराव करत असे. त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनामुळे 3 डिसेंबर 2024 रोजी उरण तालुक्यातील घारापुरी ते करंजा जेट्टी हा समूद्रातील प्रवाह( चॅनेल )पोहून त्यांनी नवा विक्रम केला आहे. घारापुरी ते करंजा हे अंतर सहा तासाच्या आत पूर्ण अपेक्षित होते मात्र मयंकने ते अंतर पाच तास 29 मिनिटात पूर्ण केले. गेल्यावर्षी धरमतर तर ते करंजा जेट्टी कमी वेळेत व कमी वयातील जलतरणपटू म्हणून पोहण्याचा विक्रम केला तसेच 3 डिसेंबर 2024 रोजी घारापुरी ते करंजा जेट्टी कमी वेळेत, कमी वयात पूर्ण केल्याचे दोन्ही रेकॉर्ड मयंक म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या दोन्ही मार्गावर पोहणारा तो सर्वप्रथम जलतरणपटू ठरला आहे. इतिहासात याची कायमची नोंद होणार आहे.मयंक म्हात्रे करंजा जेट्टी येथे सकाळी पोहोचताच करंजाचे ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी त्याचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले.करंजा जेट्टी येथे मयंक म्हात्रे याचा छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रितम म्हात्रे,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत,सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर,महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, एडवोकेट सागर कडू, प्राध्यापक एल बी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाखवा, चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश थळी,नितीन कोळी, हेमलता पाटील, संजय ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मयंक म्हात्रे याला सुरवातीपासून त्याचे आई वीणा दिनेश म्हात्रे व वडील दिनेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
मयंकच्या या ऐतिहासिक कामगिरीस प्रशिक्षक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनिल पाटील, प्रशिक्षक मनोहर टेमकर, जलतरण पटू आर्यन मोडखरकर, जयदीप सिंग, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील आदींचे सहकार्य या विक्रमा दरम्यान लाभले आहे. मयंक म्हात्रे याच्या आजपर्यंतच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंटमेरी स्कुलच्या माध्यमातून राज्यस्तरावर झाली आहे. उरण नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा, मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे वर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंद

विद्युत तारा उघड्यावर,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

माणगाव, (सलीम शेख) -माणगाव शहरातील नेहमी गजबजलेला मोर्बा रोड येथील गेले दोन महिने महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालय ते दिनेश पवार यांच्या इमारतीच्या 500 मिटर अंतरातील सुमारे 20 विद्युत खांबावरील पथ दिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत असल्याने या परीसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दिघी – माणगाव-पूणे हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय ते दिनेश पवार यांच्या इमारती पर्यंत जमिनीखालून महामार्गावरील पथदिव्यांसाठी विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र हे पथदिवे कधीच कायम स्वरुपी प्रकाशले नाहीत. कधी मंद तर कधी बंद अशी अवस्था झाली होती. आता तर हे पथदिवे दोन महिने कायम स्वरुपी बंद अवस्थेत आहेत. हि जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची असूनही ते या गैरसोयी कडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत माणगाव नगरपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार आणि फोनवरून संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात. तसेच प्रांताधिकारी माणगाव यांच्या कडेही याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही पथदिव्यांचा प्रकाश पडलेला नाही. विद्युत जोडणी करताना विद्युत तारा जमिनीखालून जोडण्यात आलेल्या नाहीत. त्या प्रवाहित तारा रस्त्यावरून खड्ड्याचा चर न खोदता उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी त्या विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे विजेचा झटका लागून दुर्दैवी घटना घडून नागरिकांचा मृत्यू ओढवला जाण्याची भीती वाटत आहे.

याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने ही आमची जबाबदारी नाही असे सांगून हात झटकले आहेत. काही ठिकाणी या विद्युत तारा वितळलेल्या आहेत. त्यामुळे सिद्धी नगर आणि खांदाड भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. काही वेळा विद्युत दाब कमी जास्त होऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत. पथ दिवे सुरू नसल्याने रात्रीच्या अंधारात चाचपडत जावे लागते. तसेच छोटेमोठे अपघात आणि चोऱ्या होत असतात. काही ठिकाणी विद्युत उच्च दाबाच्या तारा उघड्यावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा मोर्बा रोड दिवस रात्र गजबजलेला असून वाहनांची सतत रहदारी असते.मोर्बा रोड हा शहरातील महत्वाचा मार्ग असून हा महामार्ग म्हसळा,श्रीवर्धन,हरी हरेश्वर,दिवेआगर या पर्यटन स्थळांना जोडला गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत अशी मागणी सिद्धीनगर आणि खांदाड भागातील नागरिकांनी केली आहे.

महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी

महाड, (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी पत्रकारांच्या राज्यव्यापी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाड येथे महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी डॉ. अन्सारी यांच्या न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. रक्त शर्करा, रक्तदाब, रक्ताच्या विविध तपासण्या, विद्युत हृदयाभिलेख आदि तपासण्या करण्यात आल्या. न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. वारिस अन्सारी, डॉ. जमिल अन्सारी, सिस्टर रेश्मा राणे, सिस्टर रुखसार सिद्दीकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आरोग्य तपासणी केली. महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय भुवड, सचिव श्रीकांत पार्टे, सचिन कदम, रोहन शिंदे, उत्तम तांबडे, राजेश भुवड, चंद्रहास नगरकर आदि सदस्य यावेळेस उपस्थित होते.

आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार! एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : लालपरीप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बसचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु याच प्रवासाबद्दल एसटी महामंडळ मोठा निर्णय घेणार आहे. लालपरीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली शिवशाहीचा प्रवास कायमचा थांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचे वाढत्या अपघाताचे प्रकरण पाहता राज्य परिवहन महामंडळ शिवशाही बसची सेवा थांबविण्याच्या तयारीत आहे. नुकतेच शिवशाही बसचे गोंदियामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून याआधीही शिवशाही बसचे अनेक अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, अपघाताचे वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाड एसटी आगारात 8 शिवशाही बसेस असून या बसेस मुंबई, बोरीवली, ठाणे या मार्गावर धावा असतात. साध्या बसेस सुरु केल्याने या लांब पल्ल्याच्या प्रवासातील आरामदायी प्रवासाला प्रवासी मुकणार आहे.

शिवशाहीचे लालपरीत रुपांतर सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 892 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच !

आपल्या विजयी चौकारात सर्वांचा वाटा :आ. भरतशेठ गोगावले

महाड, (प्रतिनिधी)- महायुतीतील घटक पक्षासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, माझे कुटुंबिय व महाडकर जनतेचे आपल्या आमदारकीच्या विजयी चौकारात योगदान असून रायगड जिल्हयात शिवसेनेने तीन जागा घेतल्याने महायुतीतील मोठा भाऊ म्हणून रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच असेल असा विश्वास महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या निवडणुकीत आम्हाला किमान 35 हजारांचे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र विशिष्ट समाजाने मला मतदान न केल्याने हे मताधिक्य कमी झाले. तरी आतापर्यंतच्या विजयातील हे मताधिक्य अधिक आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्ष, शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अपार मेहनत घेतली. आपल्या कुंटुंबियांनी देखील प्रचारात मोठा सहभाग नोंदविला त्यामुळे हा विजयी चौकार मारणे आपल्याला सोपे गेल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या विजयात अदृश्य हातांचाही मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्रीपद दिले जात नसल्याने एकनाथ शिंदे हे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नाराज असल्याची आवई माध्यमांनी उठवली आहे. पाच दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेवून त्यांनी भाजपा याबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चामध्ये काही तथ्यं नाही अशी स्पष्टोक्ती आ. भरतशेठ गोगावले यांनी दिली.निवडून आल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याऐवजी स्वतः सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला होता. मात्र ते सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजेत यासाठी आम्ही (शिवसेना आमदार) आग्रही असून त्यांची समजूत काढीत असल्याचे आ. गोगावले

म्हणाले.पराभवानंतर उद्धव ठाकरे काय म्हणतात, संजय राऊत काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही. आता विरोधक मतदान यंत्रांबद्दल शंका उपस्थित करित आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांना मोठे यश मिळाले. त्यावेळेस आम्ही असा कोणता आक्षेप घेतला नव्हता. आता पाच वर्ष त्यांनी आक्षेप घेत रहावे आम्ही आमचे काम करित राहू असे आ. गोगावले म्हणाले.
विकासाला गती

या निवडणुकीपूर्वी महाड विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी आपण साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून प्रस्तावित असलेली कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेले धरण प्रकल्प , जलजीवन मिशन योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून ती कामे सुरु करण्यावर आपला भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. महाड मतदार संघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर आपण भर देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. महाड शहराला असलेला पुराचा धोका कमी करण्यासाठी नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम यावर्षी पुन्हा सुरु करण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. रोजगाराच्या मुद्यावर आपण भर देणार आहोत. येत्या काही दिवसांतच दिडशे तरुणांना कारखान्यांमध्ये कायम स्वरूपी सामावून घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

माणगांव मधून भारत जोडो अभियानाच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा

विधान सभेचे लागलेले निकाल धक्कादायक व अविश्वसनिय-चंद्रकांत गायकवाड
वावेदिवाळी इंदापूर, (गौतम जाधव) -महाराष्ट्रातील विधान सभेचे निकाल हे धक्कादायक व अविश्वसनिय लागल्यामुळे त्याच्या निषेधार्थ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव हे दि.28 नोव्हेंबर 2024 रोजी पासून गेली तीन दिवस पुणे फुले वाडा येथे उपोषणास बसले असून त्याच्या या उपोषणास रायगड माणगांव मधून भारत जोडो अभियान या संघटनेच्या वतीने माणगांव तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करून जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी भारत जोडो अभियाचे कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांनी बोलताना सांगितले की हा विधान सभेचा लागलेला निकाल हा मोठा धकादायक असून अविश्वसनिय असल्याचे सांगून डॉ. बाबा आढाव यांनी केलेल्या उपोषणास आमचा पाठींबा दर्शविण्यासाठी आम्ही उपोषणास बसलो असल्याचे सांगितले. यावेळी भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते पदाधिकारी महिलावर्ग उपस्थित होत्या.

मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; पारा आठ अंशांवर

दापोली : दापोली शहर परिसर अर्थात मिनी महाबळेश्वर येथे कडाक्याची थंडी पडली आहे. आज पहाटे तापमानाची सर्वात कमी म्हणजेच 8.8 अंश सेल्सिअस नोंद झाली. यापूर्वी 1999 मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची (3.4 अंश सेल्सिअस) नोंदही दापोलीत झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर शनिवारी (ता. 30) ही नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता.29) सकाळी 8 पासून शनिवारी (ता.30) सकाळी 8 वा. पर्यंत झालेल्या चोवीस तासांतील ही नोंद आहे. मागील वर्षी याच तारखेला कमाल तापमान 31.4 अं.सें. तर किमान तापमान 16.8 अं.सें. होते, असे दापोली येथील कृषी विद्यापिठाच्या कृषी विद्या विभागातर्फे सांगितले. सुरू झालेल्या थंडीमुळे उत्साही पर्यटकही थंडीचा आनंद लुटण्यासाठी दापोली हर्णै परिसरात हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.

दापोली शहर समुद्र सपाटीपासून 250 मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. एवढ्या उंचीवर असले तरी अवघ्या 7 ते 8 किमीवर समुद्र किनारा आहे. सध्या किना-यावर देखील गेले दोन दिवसांपासून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे किनारपट्टीला देखील थंड हवामान आहे. तर ग्रामीण भागातही सकाळी 9 वाजेपर्यंत चांगलेच धुके जाणवत असून दापोली-मंडणगड परिसर गारठला आहे.गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये 16 जानेवारी 2024 रोजी तापमानाची सर्वात कमी म्हणजेच 9.4 अंश सेल्सिअस नोंद झाली होती. तर 13 जानेवारी 2023 रोजी नीचांकी 9.2 अंश इतके तापमान नोंदले गेले होते. थंडीचा हंगाम सुरू होताच पक्ष्यांची गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किनाऱ्यावर सकाळ, संध्याकाळ सिगल पक्ष्यांचा मुक्काम असतो. थंडीच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल परिसर यामुळे हे पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात.यापूर्वीचे नीचांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)3 जानेवारी 1999- 3.49 फेब्रुवारी 2019- 4.515 फेब्रुवारी 1985- 5.0019 फेब्रुवारी 1996- 6.023 जानेवारी 1997- 7.0

यु.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षा-2025

(वैकल्पिक विषय व मुलाखत)

या स्तंभामध्ये आपण युपीएससीच्या नागरी स्पर्धा परीक्षा 2025 हे उद्दीष्ट ठेवून या परीक्षेचे स्वरूप म्हणजेच प्रथम पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा कशा प्रकार घेतली जाते यावर चर्चा केली. यु. पी एस. सी.च्या नागरी सेवा परीक्षेच्या एकूण तीन पायऱ्या आहेत. पूर्व मुख्य परीक्षा व शेवटी मुलाखत. पूर्व परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेत विचारात घेतले जात नाहीत. ती एक प्रकारची चाळणी परीक्षा आहे. मात्र मुख्य परीक्षेत प्रविष्ठ होण्यासाठी यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र मुख्य परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण विचारात घेऊन अंतिम निकाल घोषीत केला जातो.

मुख्य परीक्षेत निबंध, भाषा, सामान्य अध्ययन एक ते चार पेपरचे आपण या सदरात अवलोकन केले आहे. मात्र याच विषयात वैकल्पिक विषयाचा देखील समविश आहे. प्रत्येकी 250 गुणाचे असे एकूण 500 गुणांचे दोन विषय आपणास घ्यावे लागतात. एकूण 48 वैकल्पिक विषयातून उमेदवाराला विषय निवडावा लागतो या वैकल्पिक विषयात कला, कृषी, विज्ञान वैद्यकीय अभियांत्रिकी वाणिज्य, व्यवस्थापन यांचा समावेश आहे. 48 विषयामध्ये साहित्यासाठी 23 तर इतर असे 25 विषय आहेत, वैकल्पिक विषय निवडताना उमेदवाराने ज्या विषयात पदवी प्राप्त केती आहे. तो त्याला प्राधान्य देणे उचित राहिल. आपली आवड लक्षात घेऊन विषय निवडला तर चांगले गुण प्राप्त होतील. त्याकरीता वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेत स्थळावर जाऊन पहावा व जो विषय योग्य वाटत असेल त्याची निवड करावी. मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका पटाव्यात त्यामुळे अभ्यास करताना योग्य दिशा प्राप्त होईल. अभ्यासाकरीता ग्रंथ संपदा कोठे उपलब्ध होईल. तेथून प्राप्त करावी. वैकल्पिक विषय निवडताना त्याचा अभ्यासक्रम अभ्यास साहित्य पदवीचा विषय, आवड, गत वर्षाच्या प्रश्नपत्रिका, वेळेचे नियोजन आपले लेखन कौशल्य, या सारख्या बाबीवर विशेष लक्ष द्यायला हवे येथे एकूण 48 विषयांचा आढावा घेणे शक्य होणार नाही त्यामुळे अगदी सारांश स्वरूपात दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील नियोजन उमेदवाराने करायचे आहे.

हे सर्व पेपर्स झाल्यावर यशस्वी (पात्र) उमेदवारांना मुलाखती साठी पाचारण केले जाते. मुलाखतीला व्यक्तिमत्व चाचणी असेही म्हटले जाते. मुलाखतीला जाताना आत्मविश्वास, (फाजीलनको) उत्तरे देण्याचे कौशल्य महत्वाचे आहे. मुलाखती मध्ये आशयासोबत अभिव्यक्ति देखील महत्वाची आहे. आपले मत व्यक्त करताना पूर्ण आत्मविश्वासाने अभिव्यक्त होणे गरजेचे आहे या करीता चालू घडामोडी, जगाचा इतिहास, आपल्या राष्ट्राचा अभ्यास त्याय बरोबर इतर विषयांचा अभ्यास महत्वाचा आहे. आयोगाच्या त्या वर्षाच्या मुलाखती हेतू क्षमता बाबत आपली अपेक्षा स्पष्ट करते. याकडे लक्ष देऊन तयारी करावी. मुलाखतीची तयारी करताना निर्णय क्षमता नेमके उत्तर मुलाखतीतील अभ्यास घटक शैक्षणिक पार्श्वभुमी आत्मविश्वास चालू घडामोडी व इतर विषयांचा अभ्यास महत्वाचा आहे. मुलाखतीद्वारे प्रशासन चालवणाऱ्या उमेदवाराकडे क्षमतांचा आढावा घेतला जातो. एकूण 275 गुणांची मुलाखत ही परीक्षेच्या यशस्वीतेसाठी अत्यावश्यक आहे. मुलाखतीद्वारे उमेदवाराची सेवापदासाठी क्षमता तपासली जाते. यामध्ये शैक्षणिक व शिक्षणबाह्य विषयाचे महत्व आहे. आपण यु ट्यूब, गुगल वर पाहतो की कशा प्रकारे मुलाखत घेतली जाते. तज्ञ व्यक्तिंचे मंडळ ही मुलाखत घेतात. त्याना नेतृत्व गुण, नैतिक बांधीलकी- सामाजिक भान, सकारात्मकता, आशावाद, बौद्धिक क्षमता, व इतर विषयावर प्रश्न विचारले जातात. मुलाखतीपूर्वी उमेदवाराने पूर्व व मुख्य परिक्षा दिली असतेच त्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानावर प्रश्न विचारले असतात. त्याचा उमेदवाराने अभ्यास केलेला असतो. याचाच अर्थ असा की मुलाखत ही उमेदवाराचे ज्ञान तपासण्याची चाचणी नसून परिस्थिती एखादी बाब हाताळताना त्याचे कौशल्य दृष्टीकोन कसा असेल हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून मुलाखतीला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जावे. अर्थात ज्ञानावर आधारीतच प्रश्न अपेक्षित असतात. पण ते व्यक्त करताना कशा प्रकारे केले जातात याला महत्व आहे. नकारात्मकता अपवाद करून प्रसंगावर मात कशी करावी याचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे.
मुलाखतीमध्ये अपेक्षित असलेल्या (तज्ञ मंडळीना) उत्तरे देताना खालील बाबी महत्वाच्या आहेत.

घाई – विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना घाई करू नये. विचारपूर्वक उत्तर द्यावे फक्त आत्मविश्वासाने झुठ पण नीट ही थिअरी चालत नाही समोर मुलाखतकार ही तज्ञ मंडळी अरि याचे भान ठेवून उत्तर द्यावे. जर उत्तर येत नसेल तर तसे सांगावे चुकीची उत्तरे देऊ नयेत. उमेदवारांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे अपेक्षित नसतात. हे ही लक्षात ठेवावे.
पूर्वग्रहदूषित मतः – जर एखादा प्रश्न धर्म, राजकारण, इतिहास, वंशावर असेल तर उत्तर देताना समतोल, तर्कयुक्त द्यावे. येथे पूर्वग्रहदुषित, व एकांगी उत्तर देण्याचे टाळावे.
विनम्रताः विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुलाखतकारांना आपले उत्तर पटले नाही तर त्याच्याशी वाद घालू नयेत हातवारे करून भांडू नये. उमेदवारांने विनम्रपणे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.

संतुलित स्वरूपः- उमेदवारांना विचारलेले प्रश्न हे त्याचा दृष्टीकोन विचार, सकारात्मक, भूमिका तपासणारे असतात. त्यामुळे उत्तरे नेमकी संतुलित द्यावीत, उत्तर येत नसल्यास तसे सांगणे हे देखील प्रामाणिकपणाचे लक्षण समजले जाते.
आत्मविश्वासः- मुलाखत देताना व्यक्तिमत्व दिसून येतं. कारण उत्तर कसे उमेदवार देत आहे हे महत्वाचे आहे. (त्याच्यामध्ये आत्मविश्वास सकारात्मकता हजगर्जीपणा, आवड पाहिले जाते.

निर्णय समताः प्रशासकीय काम करताना काही निर्णय तातडीने सुद्धा घ्यावे लागतात. तसेच विविध स्वरुपात निर्णय घ्यावे लागतात, मुलाखतीमध्ये जरी निर्णयक्षम प्रश्न विचारून उमेदवारांची निर्णय क्षमता तपासली जाते. मात्र उत्तर निर्णयक्षम असायला हवे.
शैक्षणिक पार्श्वभूमीः उमेदवाराची शालेय ते पदव्यूत्तर पर्यंतची शैक्षणिक माहिती घेतली आहेच, त्याचे ज्ञान देखील असावे. म्हणजेच संकल्पना, उपयोजना, शिक्षण संस्था, त्यांची ठिकाणे याचा देखील अभ्यास करावा.

विविध अभ्यासघटका ः आपले नाव, तालुका जिल्हा, विभाग, राज्य, याची संपूर्ण माहिती असावी. यामध्ये इतिहास, भूगोल, समाज व्यवस्था, अर्थकारण, राजकारण, लोकसभा, रोजगार या संबंधी अभ्यास महत्वाचा आहे.
चालू घडामोडी ः मुलाखतीमध्ये चालू घडामोडी विषयाच्या प्रश्नांचा समावेश असतो त्यामध्ये राष्ट्रीय, राज्य, आतंरराष्ट्रीय, आर्थिक तंत्रज्ञान, विज्ञान, क्रिडा, किंवा नुकताच भारत, चीन सैनिक माघारी घेण्याचा निर्णय, रशिया-युक्रेन युध्य, इस्त्रायल-फिलिस्तान युद्ध याचा बारकाईने अभ्यास करणे महत्वाचे आहे. एकंदरीत मुलाखत म्हणजे आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता, व्यक्तिमत्व, सकारात्मकता, प्रामाणिकपणा, ज्ञान यावर आधारीत आहे. उमेदवारांनी त्या दृष्टीने अभ्यास करणे फायद्याचे ठरेल.

अ. रऊफ खतीब
शैक्षणिक समुपदेशक
खेड – रत्नागिरी